नालासोपारा दरोडाप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:46 IST2020-06-06T00:46:12+5:302020-06-06T00:46:14+5:30
आरोपींना पोलीस कोठडी : ४० लाखांचा ऐवज हस्तगत, गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग उघड

नालासोपारा दरोडाप्रकरणी चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : युनायटेड पेट्रो फायनान्स गोल्ड व्हॅल्युअर आयटीआय गोल्ड लोनच्या नालासोपारा शाखेवर पडलेल्या एक कोटी ७७ लाखांच्या सशस्त्र दरोडाप्रकरणी टोळीतील चार जणांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३९ लाख ७१ हजार ६०० रुपयांचा ऐवज तसेच पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वसईच्या प्रथम वर्ग न्यायालयात त्यांना हजर केले असता १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वसई तालुक्यातील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नालासोपारा येथील युनायटेड गोल्ड लोनच्या शाखेमध्ये २० सप्टेंबर २०१९ रोजी सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दोन पथके तयार केली होते. या पथकांमधील सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे व संतोष गुर्जर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईमधील मालाड, अंधेरी येथे राहणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्यावर गुजरातमधील वापी, कर्नाटकमध्ये खून, दरोडे, चोरी, वाहनचोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली. यातील काही आरोपींचा संबंध छोटा राजन टोळीशी असल्याबाबत विचारले असता तपास सुरू असल्याने बोलता येणार नाही, असे शिंदे म्हणाले. प्रकरणाचा यशस्वी तपास करणाऱ्यांना १५ हजार रोख आणि प्रशस्तीपत्रक देण्याची घोषणाही शिंदे यांनी केली.
सात वर्षांपूर्वीच्या चोरीची कबुली : चार आरोपींनी चौकशीत २८ आॅगस्ट २०१३ रोजी नालासोपारा येथील अॅक्सिस बँकेत कॅश घेऊन जाणाºया व्हॅनमधील सहा कर्मचाºयांना मारहाण करून तीन कोटी ८७ लाख ५० हजारांची रोकड लुटल्याचीही या आरोपींनी कबुली दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.