परदेशी सायबर टोळीचा म्होरक्या मार्को जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:36 IST2025-10-18T13:35:25+5:302025-10-18T13:36:22+5:30
चीन, कंबोडिया, लाओस आणि म्यानमारमधील सायबर गुन्हेगारी टोळ्यांशी थेट संपर्क असलेल्या मार्कोने देशातील असंख्य बोगस बँक खात्यांचा वापर करत सायबर फसवणुकीतील रकमेचे रूपांतर रोख रकमेपासून क्रिप्टो करन्सीत करून म्होरक्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

परदेशी सायबर टोळीचा म्होरक्या मार्को जेरबंद
मुंबई : सायबर गुन्हेगारी जगतात मार्को या नावाने कुख्यात असलेला युवराजसिंग सिकारवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी त्याला अटक केली असून, ३१ सायबर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. मार्कोला देशाची कोणतीही पोलिस यंत्रणा अटक करू शकली नव्हती.
चीन, कंबोडिया, लाओस आणि म्यानमारमधील सायबर गुन्हेगारी टोळ्यांशी थेट संपर्क असलेल्या मार्कोने देशातील असंख्य बोगस बँक खात्यांचा वापर करत सायबर फसवणुकीतील रकमेचे रूपांतर रोख रकमेपासून क्रिप्टो करन्सीत करून म्होरक्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. विशेष बाब म्हणजे, तो मोबाइल फोन वापरत नव्हता. त्यामुळे अनेक पोलिस यंत्रणांना त्याला अटक करण्यात अपयश आले होते. मात्र, निरीक्षक संदीप ऐदाळे आणि त्यांच्या पथकाने चिकाटीने तपास करत एक महिला व तिच्या पतीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला शोधून काढले.
मार्काे प्रकरणात सुरेश पटेल, मुसा कुंभार, चिराग चौधरी, अंकित शहा या पाच जणांनाही अटक करण्यात आली असून, पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांकडून ५८ कोटींच्या फसवणुकीचा तपास लावला आहे. पोलिस उपायुक्त आर. रागसुधा, वरिष्ठ निरीक्षक विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप ऐदाळे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गोविंद खैरे, महेश मोहिते आणि पथकाने मार्को आणि त्याच्या पाच साथीदारांना बेड्या ठोकल्या.
५८ कोटी साडेसहा हजार खात्यांमध्ये ट्रान्सफर
आरएके मार्ग पोलिसांना मार्कोपर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या दाम्पत्याच्या खात्यावर जमा झालेले १.७८ कोटी हे ५८ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील असल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने सात जणांना बेड्या ठोकल्या. आरएके मार्ग पोलिसांनी अटक केलेल्या मार्कोचाही ताबा घेण्याची शक्यता आहे. मुंबईच्या वृद्ध व्यावसायिकाकडून उकळलेले ५८ कोटी भामट्यांनी विविध बँकांच्या साडेसहा हजार खात्यांमध्ये वळवले. यातील बहुतांश खाती बोगस कंपन्यांच्या नावे आहेत, अशी माहिती शुक्रवारी सायबर महाराष्ट्रने दिली.
असा झाला उलगडा...
डिजिटल अटकेत एकाकडून ७० लाख रुपये उकळण्यात आले होते. त्या गुन्ह्याचा तपास करताना एका बँक खात्यापर्यंत पथक पोहोचले.
महिलेच्या नावे असलेल्या चालू (करंट) खात्यात १.७८ कोटी रुपये जमा झाले. त्यातील ७० लाख या प्रकरणातील होते. महिला आणि तिच्या पतीकडे चौकशी केली असता एका अंकित नावाच्या व्यक्तीने ट्रस्टचे पैसे ठेवण्यासाठी काही काळ हे खाते वापरल्याची कबुली दिली.
प्रत्यक्षात या दाम्पत्याचीही फसवणूक झाल्याने त्यांनी दिलेल्या माहिती आधारे टप्प्याटप्याने पथक सुरेश पटेल, मुसा कुंभार, चिराग चौधरी, अंकित शहा आणि मार्कोपर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.