विनयभंग केल्याप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:48 IST2019-04-22T17:47:38+5:302019-04-22T17:48:05+5:30
डॅमेना गेटराचेव्ह अकाने (५१) असं या आरोपीचं नाव आहे.

विनयभंग केल्याप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक
मुंबई - कुलाबा पोलिसांनी कुलाबाच्या तुलस रोडवरील एका रेस्टॅरंटमध्ये तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ५१ वर्षीय इथोपियन नागरिकाला पोलिसांनीअटक केली आहे. डॅमेना गेटराचेव्ह अकाने (५१) असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मूळ इथोपियाचा नागरिक असलेला डॅमेना हा शनिवारी पहाटे कुलाबाच्या रेस्टॅरंटमध्ये त्याच्या मित्रासोबत गेला होता. त्यावेळी २१ वर्षीय पीडित तरुणी तिच्या नातेवाईकांसोबत जेवण्यासाठी आली होती. पीडित तरुणी हात धुण्यासाठी बेसिंगजवळ जात असताना डॅमेना याने तिचा हात पकडत, तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संतापलेल्या तरुणीने डॅमेनाच्या कानाखाली लगावली. या प्रकारानंतर रेस्टॅरंटमधील कर्मचारी आणि तरुणीच्या कुटुंबीयांनी डॅमेनाला चोप देत पोलिसांना बोलावले. घटनास्थळी कुलाबा पोलीस आल्यानंतर डॅमेनाला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॅमेनावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.