पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न; संशयित तरुणाला १० दिवसांची पोलिस कोठडी
By नारायण बडगुजर | Updated: December 15, 2025 22:08 IST2025-12-15T22:07:35+5:302025-12-15T22:08:21+5:30
पाच वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून केले दुष्कृत्य

पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न; संशयित तरुणाला १० दिवसांची पोलिस कोठडी
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: नराधम तरुणाने पाच वर्षांच्या मुलीचे चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अपहरण केले. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. या प्रकरणात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात आली. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे. ही घटना रविवारी (दि. १४ डिसेंबर) सकाळी मावळ तालुक्यातील उर्से येथे उघडकीस आली. संबंधित संशयित तरुणाला सोमवारी (१५ डिसेंबर) न्यायालयात हजर केले. त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. खून झालेल्या मुलीच्या २७ वर्षीय आईने याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
समीर कुमार सीताराम मंडल (वय ३२, रा. उर्से, ता. मावळ; मूळ रा. झारखंड), असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांना पाच वर्षे मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिचा शोध घेतला. दरम्यान मुलगी तिच्या घराशेजारी राहणाऱ्या समीर नावाच्या व्यक्ती सोबत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. समीर हा एका कंपनीमध्ये काम करत होता. त्याला तिथून पोलिसांनी रविवारी पहाटे ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुलीचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र संशयित याची कबुली देत नव्हता. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्याने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्यासोबत नेले. त्यानंतर तो दारू प्यायला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केला असल्याचे समोर आले.