उद्योगनगरीत एकाच दिवशी पाच वाहने लंपास : सायकलचीही चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:54 IST2019-07-23T12:53:07+5:302019-07-23T12:54:34+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एकाच दिवसात वेगवेगळ्या प्रकारची पाच वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

उद्योगनगरीत एकाच दिवशी पाच वाहने लंपास : सायकलचीही चोरी
पिंपरी : मागील काही दिवसांमध्ये शहरामध्ये अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. असे असताना आता चोरटे दुचाकी, कार यासारख्या वाहनांबरोबरच मालवाहतूक करणारे पिकअप आणि महागड्या सायकलही चोरून नेत असल्याने पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एकाच दिवसात वेगवेगळ्या प्रकारची पाच वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. चोरीच्या घटना वाढलेल्या असतानाही या चोरट्यांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
रविवार (दि. २१) रोजी शहरात विविध ठिकाणी चोरीला गेलेल्या वाहनाचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लहानू हरिभाऊ आग्रे यांनी त्यांची दुचाकी भोसरी एमआयडीसी परिसरातील गणराज हॉटेल समोरील किराणा दुकानासमोर लावलेली होती. ते किराणा साहित्य घेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच १४/एवाय/८९११) बनावट चावीच्या साहाय्याने चालू करून चोरून नेली. तर चिंचवड येथील घटनेमध्ये चोरट्यांनी इंडिका व्हिस्टा हे चारचाकी वाहन चोरून नेले. रियाज शौकत शेख (वय ६६) यांनी त्यांची इंडिका गाडी दि. ११ जुलै रोजी त्यांच्या घरासमोर लावली असता अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने चालू करून पळवून नेली. हिंजवडी येथे अनिल रामगोपाल गुप्ता (वय ६०, रा. मारुंजी) यांनी त्यांची ७० हजार रुपयाची दुचाकी (क्र. एमएच १२/पीके/२५९२) ही दि. २० जुलै रोजी रात्री लॉक करून पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली.