५ वर्षीय मुलीचे अपहरण करून विक्री; ६० वर्षीय बीएएमएस महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 07:51 IST2025-11-26T07:51:04+5:302025-11-26T07:51:24+5:30
नवी मुंबईतून मुलीची केली सुटका, पीडित मुलीची आईला मानसिक विकार असल्यामुळे ती रोज रात्री घराबाहेर पार्क रिक्षात झोपायची.

५ वर्षीय मुलीचे अपहरण करून विक्री; ६० वर्षीय बीएएमएस महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक
मुंबई - मानसिक आजारी असलेल्या एका आईच्या असहायतेचा फायदा घेऊन तिचा भाऊ, पत्नी, मुलगा आणि एका रिक्षाचालकाने तिच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून एका बीएमएस डॉक्टरला विकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला येथून वृंदा चव्हाण (६०) या बीएएमएस डॉक्टरसह सहा जणांना वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीला आरोपी मामानेच सहा लाख रुपयांना विकल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी मुलीची नवी मुंबई परिसरातून सुटका केली.
अटक झालेली डॉक्टर वृंदा ही अलीकडेच पती गमावल्याने मूल दत्तक घेण्याच्या विचारात होती. याच कारणामुळे तिने आपल्या सोसायटीत क्लिनरचे काम करणाऱ्या करण सणस (२५) याच्याशी संपर्क साधला. सणसने मित्रांच्या मदतीने मुलीचे अपहरण करून वृंदा यांना सहा लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली. पीडित मुलगी आईसोबत वाकोल्यात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डोळे उघडले, तेव्हा मुलगी कुशीत नव्हती
पीडित मुलीची आईला मानसिक विकार असल्यामुळे ती रोज रात्री घराबाहेर पार्क रिक्षात झोपायची. २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री मामा निकोलस फर्नांडिस, त्याची पत्नी मंगल, मुलगा नितीन आणि रिक्षाचालक लतीफ शेख, तसेच करण सणस यांनी मिळून रिक्षात आईच्या कुशीत झोपलेल्या मुलीचे अपहरण केले. सकाळी आईचे डोळे उघडले, तेव्हा मुलगी कुशीत नव्हती. मात्र, त्यावेळी घाबरून कुणालाही याबाबत सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी तिने पतीला माहिती दिल्यानंतर वाकोला पोलिसात तक्रार नोंदवली.
‘व्ही’ लिहिलेल्या रिक्षाचा पथकांकडून शोध
पोलिस उपायुक्त मनीष कलवनिया यांच्या मार्गदर्शनाखाली वाकोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक सहदेव डोळे, निरीक्षक वैभव सामी, सहायक पोलिस निरीक्षक महेश तळेकर, सुनील सर्वे, उपनिरीक्षक रितेश माळी, संग्राम बागल, विजय ठोसर, जीवन गुट्टे, अरुण बांगर, यशपाल बडगुजर, सुनीता घाडगे यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकांनी २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार मागे ‘व्ही’ चिन्ह असलेली रिक्षा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर ही रिक्षा आरोपी शेखची असल्याचे समजले. त्याला इतर आरोपींनी अपहरणात मदत करण्यासाठी ६ हजार रुपये दिले होते.