अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या; पूर्व वैमनस्त्यातून हत्येचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 20:23 IST2021-12-25T20:22:11+5:302021-12-25T20:23:31+5:30
आई शेजारी गेली असतानाच कुणीतरी अज्ञाताने त्याला घरातून उचलले आणि बाहेरच असलेल्या एका पाण्याने भरलेल्या टाकीत टाकून दिले आणि त्यावर झाकण लावले.

अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या; पूर्व वैमनस्त्यातून हत्येचा संशय
ठाणे- पाण्यानें भरलेल्या प्लास्टीकच्या टाकीत (बॅरल) बुडवून पाच महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची संतापजनक घटना शनिवारी समोर आली आहे. कळवा साईबानगर झोपडपट्टीतील एका घरातून शुक्रवारी हा मुलगा बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कळवा येथील साईबानगर येथील झोपडपट्टीमध्ये शंकर आणि शांती चव्हाण हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना चार वर्षांचा एक मुलगा आणि पाच वर्षांच्या एका मुलीसह हा पाच महिन्यांचा मुलगा होता. शंकर हा बिगारीचे काम करून उदरनिर्वाह करतो. त्यात २४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास घरात हा पाच महिन्याचा मुलगा झोपला होता. या दरम्यान त्याची आई शेजारी गेली असतानाच कुणीतरी अज्ञाताने त्याला घरातून उचलले आणि बाहेरच असलेल्या एका पाण्याने भरलेल्या टाकीत टाकून दिले आणि त्यावर झाकण लावले. यामुळे त्या लहान बालकाचा मृत्यू झाला.
दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्याने शंकर आणि त्याच्या पत्नीने कळवा पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पोलीस त्याचा शोध घेते असतानाच त्याच्या हत्येचा हा प्रकार समोर आला. या घटनेने संपूर्ण ठाणे शहरात खळबळ उडाली असून ही हत्या कोणी केली याचा शोध कळवा पोलीस घेत आहेत.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड आदी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यातील आरोपीना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त अंबुरे यांनी सांगितले.