मालाड गोळीबार प्रकरणी पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 14:04 IST2020-02-05T13:57:36+5:302020-02-05T14:04:47+5:30
याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालाड गोळीबार प्रकरणी पाच जणांना अटक
मुंबई - मालाडच्या कुरार परिसरात करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व कुख्यात गुंड उदय पाठक या टोळीचे असून दुकानावर गोळीबार करणाऱ्या इसमाचा शोध सुरू असल्याचे परिमंडळ - १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी यांनी सांगितले.
मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये शनिवारी भरदिवसा एका तरुणाने गोळीबार केला. दोन ठिकाणी हवेत करण्यात आलेल्या या गोळीबारामध्ये कुणीही जखमी झाले नसले तरी यामुळे परिसरात घबराट पसरली होती. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुरार गावातील शिवाजी नगर मासळी मार्केट येथील केमिस्टच्या दुकानासमोर दुपारी दीडच्या सुमारास एक तरुण दुचाकीवरून आला. या तरुणाने भर गर्दीमध्ये पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. काही अंतर पुढे जाऊन त्याने पुन्हा हवेत गोळी झाडली. दोन ठिकाणी गोळीबार करून तो पळून गेला होता.