जमिनीच्या वादातून रिक्षाचालकास मारहाण करून लुटणारे पाच जण अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:49 AM2020-03-17T00:49:59+5:302020-03-17T00:50:35+5:30

वयोवृद्ध रिक्षाचालकाला जमिनीच्या वादातून कट रचून जबर मारहाण करून लुटणाऱ्या एका महिलेसह पाच जणांच्या टोळीला कासारवडवली पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.

Five arrested for beating a rickshaw driver through a Land dispute | जमिनीच्या वादातून रिक्षाचालकास मारहाण करून लुटणारे पाच जण अटक

जमिनीच्या वादातून रिक्षाचालकास मारहाण करून लुटणारे पाच जण अटक

Next

ठाणे : घाटकोपर येथून घोडबंदर रोड येथे प्रवासी भाडे घेऊन गेलेल्या कैलासपती पासी (६०) या वयोवृद्ध रिक्षाचालकाला जमिनीच्या वादातून कट रचून जबर मारहाण करून लुटणाऱ्या एका महिलेसह पाच जणांच्या टोळीला कासारवडवली पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. या पाचही जणांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

पासी हे ठाणे ते मुंबई परिसरात रिक्षा चालवितात. ते १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घाटकोपर येथून एक अनोळखी महिला आणि पुरुष अशा दोन प्रवाशांना ठाण्यातील घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल येथे घेऊन गेले होते. येथे त्यांच्यापैकी प्रवासी महिला उतरली. तर, पुरुषाने रिक्षा माजिवडा येथे नेण्यास सांगून पुन्हा फाउंटन हॉटेल येथे आणली. ते नागलाबंदर खाडीकडे आले असता, तेथील अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या रिक्षाला स्कूटरवरून आलेल्या एका अनोळखीने धक्का मारल्याचा बहाणा केला. ‘तुमने स्कूटर को धक्का क्यू मारा’, असे बोलून त्यांच्याशी जाणीवपूर्वक बाचाबाची करून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडील १२०० रुपयांची रोकड जबरीने चोरून पलायन केले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने घाटकोपर, मुलुंड, गायमुख, नागलाबंदर तसेच फाउंटन हॉटेल येथे प्रत्यक्ष जाऊन तपास केला. कळवा आणि टिटवाळा भागातील ही टोळी असल्याची माहिती तपासात समोर आली. मुख्य सूत्रधार अभिषेक सरोज (रा. कळवा, ठाणे), अभिषेक सिंग (रा. कळवा), विकास सहानी (रा. टिटवाळा) आणि चंद्रेश ऊर्फ चंदू मौर्य (रा. टिटवाळा) या चौघांना १५ मार्च रोजी तर रूपाली चौहान (रा. टिटवाळा) हिला १६ मार्च रोजी अटक केली.

कट रचून केली लूटमार
रिक्षाचालक पासी हे उत्तरप्रदेशातील बनारसचे असून सूत्रधार अभिषेक याच्यासोबत त्यांच्या गावच्या जमिनीच्या हिश्श्यावरून वाद आहेत. यातूनच त्यांच्यात भांडणे होत होती. हा त्रास असह्य झाल्याने या रागातून अभिषेकने त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने त्यांना निर्जन ठिकाणी एकटे गाठून मारण्याचा कट रचला होता. कासारवडवली पोलिसांनी हा कट उघड करून पाचही जणांना अटक केली.

Web Title: Five arrested for beating a rickshaw driver through a Land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.