बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये रोजगार सेवक मो. मुमताज यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी सबा परवीन हिला ताब्यात घेतलं आहे. सध्या तिची काझीमोहम्मदपूर पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत सबा परवीनने पतीच्या हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. मात्र, पोलीस कारवाई पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलांच्या चौकशीतून पोलिसांना या हत्याकांडात महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर पोलिसांना मुमताज यांच्या पत्नीवर संशय आला. चौकशीदरम्यान थोडी कडक भूमिका घेतल्यावर तिने सत्य कबूल केलं. तिच्या माहितीनुसार, पोलिसांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलातून घरातील सीसीटीव्हीचा डीबीआर आणि मोबाइलसह इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सबा परवीनने हे मान्य केलं आहे की, तिने आधी पतीवर हातोड्याने हल्ला करून त्याला बेशुद्ध केलं. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर डीबीआर, मोबाइल आणि इतर वस्तू घरामागील जंगलात फेकून दिल्या. मजुरांकडून सफाई करून घेतल्यानंतर पोलिसांनी या वस्तू जप्त केल्या आहेत. मुमताज यांची हत्या ७ जुलै रोजी झाली होती.
दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांमुळे पत्नी संतप्त होती!मो. मुमताज यांचं दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते, असं सांगितलं जात आहे. याच कारणामुळे सबा परवीन संतप्त होती. यापूर्वीही अनेक वेळा पतीसोबत तिचं यावरून भांडण झालं होतं. याच रागातून तिने पतीच्या हत्येचा कट रचला. एसडीपीओ वन सीमा देवी यांनी सांगितलं की, या प्रकरणी अजून चौकशी सुरू आहे आणि सोमवारी या प्रकरणाचा पूर्ण खुलासा केला जाईल.