आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:38 IST2025-11-24T18:35:35+5:302025-11-24T18:38:54+5:30
शनिवारी दुपारी अभिषेक एका ग्राहकाला सामान देण्यासाठी जात असताना, कारमधून आलेल्या तरुणांनी भररस्त्यात त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली अन्...

आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
भरदिवसा रस्त्यावर, एका डिलिव्हरी बॉयला कारने धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर कारमधून उतरलेल्या सात ते आठ हल्लेखोरांनी अवघ्या १९ सेकंदात त्याच्यावर कुऱ्हाडीचे आणि लाठ्या-काठ्यांचे १९हून अधिक वार केले. गुरुग्रामच्या शक्ती पार्क परिसरात घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर सध्या खासगी रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
आधी धडक, मग क्रूर हल्ला!
सेक्टर-१० पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या शक्ती पार्क भागात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी तरुणाचे नाव अभिषेक आहे. अभिषेक आणि त्याचा मोठा भाऊ रितेश दोघेही बिग बास्केट कंपनीत डिलिव्हरीचे काम करतात.
रितेशने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी अभिषेक एका ग्राहकाला सामान देण्यासाठी जात असताना, कारमधून आलेल्या तरुणांनी भररस्त्यात त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली. अभिषेक खाली पडताच, कारमधून सात ते आठ तरुण खाली उतरले. त्यांच्या हातात कुऱ्हाड, लाठी आणि दांडे होते. हल्लेखोरांनी अभिषेकला घेरले आणि त्याच्यावर कुऱ्हाड व काठ्यांनी अंधाधुंद वार केले. अभिषेकने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्याला जमिनीवर पाडून वार करणे सुरूच ठेवले. त्याच्या डोक्यावर, पाठीवर, हात-पायावर कुऱ्हाडीचे खोल घाव झाले.
एक आठवड्यापूर्वी धमकी, पोलिसांकडून दुर्लक्ष
घटनेनंतर हल्लेखोर कार घेऊन पळून गेले. ही संपूर्ण घटना जवळच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यात आरोपींची कारची नंबर प्लेटही स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेमागे सूडाची भावना असल्याचे अभिषेकचा भाऊ रितेश याने सांगितले. रितेश म्हणाला की, एक आठवड्यापूर्वी त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. फोन करणाऱ्याने धमकी दिली होती, "रितेश, तुला तर मारूच, पण संपूर्ण कुटुंबाला बघून घेऊ."
रितेशने लगेचच स्थानिक पोलीस ठाण्यात या धमकीची तक्रार दिली होती, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. रितेशचा दावा आहे की, हल्लेखोरांचे खरे लक्ष्य मी होतो, पण मी नसताना त्यांनी अभिषेकला एकटा पाहून त्याच्यावर हल्ला केला.
अभिषेकची प्रकृती चिंताजनक
गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला तातडीने मानेसर भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अभिषेकच्या शरीरावर कुऱ्हाडीचे २०हून अधिक खोल घाव आहेत, हात पूर्णपणे तुटला आहे आणि अनेक ठिकाणी गंभीर जखमा आहेत. सध्या तो व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
तपास अधिकारी मीनावंती यांनी सांगितले की, जखमीच्या भावाच्या तक्रारीवरून रोहित राघव आणि रोहित जिंदल यांच्यासह सुमारे आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी त्यांच्या घरातून फरार असून, त्यांच्या संभाव्य ठिकाणांवर धाडी टाकल्या जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींची ओळख पटवली जात आहे.