आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 10:50 IST2025-09-28T10:48:44+5:302025-09-28T10:50:31+5:30
उच्च न्यायालयातील ६३ वर्षीय वकिलाला आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले आणि पैसे उकळले.

आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
मुंबई : उच्च न्यायालयातील ६३ वर्षीय वकिलाला आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले आणि पैसे उकळले. पण, सततच्या धमक्यांमुळे अखेर पीडित वकिलाने पोलिसांत धाव घेऊन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. समीर अली हनीफ खान (२१) आणि भूपेंद्र भगवान सिंह (२५) अशी या दोघांची नावे असून, तिसरा आरोपी मनविंदर ऊर्फ मुन्ना फरार आहे.
७ ते २२ सप्टेंबरदरम्यान वकिलाला पीडित वकील ‘जस्ट डायल’च्या माध्यमातून मसाज सेवा शोधत होते. यावेळी समीरने त्यांच्याशी संपर्क साधला. दोन वेळा मसाज सेवा दिल्यानंतर तिसऱ्यांदा समीरसोबत भूपेंद्र आणि मनविंदरसुद्धा आले. मसाजदरम्यान भूपेंद्रने वकिलांचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ चोरून शूट केला आणि त्यानंतर तिघांनी मिळून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ५० हजार रुपये मागितले.
वकिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केली. शेवटी वकिलांनी समीर आणि भूपेंद्रला प्रत्येकी २०,००० रुपये घेतले, तर मनविंदरला १०,००० रुपये जीपेद्वारे दिले. पुन्हा आठवड्याभरानंतर भूपेंद्रने पुन्हा संपर्क करून यावेळी ६ लाख रुपयांची मागणी केली. सततच्या धमक्यांमुळे शेवटी पीडित वकिलाने बोरीवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.