फ्लायओव्हरजवळ गाठलं; न्यायालयात हजेरीसाठी नेताना कुख्यात गुंडावर अंदाधुंद गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:49 IST2025-12-24T17:48:15+5:302025-12-24T17:49:15+5:30
घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

फ्लायओव्हरजवळ गाठलं; न्यायालयात हजेरीसाठी नेताना कुख्यात गुंडावर अंदाधुंद गोळीबार
उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सर परिसरात मंगळवारी मोठी खळबळ उडाली. रुडकी कारागृहातून लक्सर न्यायालयात हजेरीसाठी नेण्यात येत असलेल्या कुख्यात गुन्हेगार विनय त्यागीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात विनय त्यागी गंभीर जखमी झाला असून, पोलीस ताफ्यातील दोन कॉन्स्टेबलही जखमी झाले आहेत.
लक्सर फ्लायओव्हरजवळ हल्ला
ही घटना लक्सर फ्लायओव्हरजवळ घडली. विनय त्यागीला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात नेत असताना, आधीपासून दबा धरून बसलेल्या दुचाकीस्वार हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. हल्लेखोरांच्या गोळीबारात विनय त्यागीला गोळी लागली, तर दोन पोलीस कॉन्स्टेबलही जखमी झाले. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
जखमींवर उपचार; आरोपीची प्रकृती गंभीर
गोळीबारानंतर जखमी विनय त्यागी आणि दोन्ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनय त्यागीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नाकेबंदी असूनही हल्लेखोर फरार
या घटनेमुळे पोलीस सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिसरात आधीपासून नाकेबंदी असतानाही हल्लेखोर गोळीबार करून पळून जाण्यात यशस्वी ठरले. हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, प्रत्युत्तरात्मक कारवाईत चकमक झाल्याचीही माहिती आहे. फ्लायओव्हर परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण होते.
जिल्ह्यात हाय अलर्ट; शोधमोहीम सुरू
घटनेनंतर संपूर्ण हरिद्वार जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. फरार दुचाकीस्वार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी व्यापक तपास व वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांतही विशेष नजर ठेवण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल आणि या घटनेच्या प्रत्येक पैलूची सखोल चौकशी सुरू आहे.