स्टीलच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कुजल्याने ओळख पटविण्यात अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:25 IST2021-05-22T09:24:29+5:302021-05-22T09:25:19+5:30
पामबीच मार्गावरून बामणदेव देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गापासून काही अंतरावर हा प्रकार घडला आहे.

स्टीलच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कुजल्याने ओळख पटविण्यात अडचणी
नवी मुंबई : सानपाडा येथे पामबीच मार्गालगत मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. घरगुती वापराच्या स्टीलच्या टाकीत कोंबून हा मृतदेह त्याठिकाणी टाकण्यात आला होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अस्वस्थेत असून या मुलीची हत्या करून त्याठिकाणी मृतदेह टाकण्यात आला आहे.
पामबीच मार्गावरून बामणदेव देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गापासून काही अंतरावर हा प्रकार घडला आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी स्टीलच्या टाकीत मृतदेह असल्याचे पादचाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले असता नेरुळ व सानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाणी साठवण्यासाठी घरगुती वापराची स्टीलची टाकी त्याठिकाणी आढळली. त्यामध्ये चादरीत गुंडाळून कोंबलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह होता. परंतु मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटलेली नाही.
मात्र त्याचे वय अंदाजे १५ ते १८ वर्षे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. या मुलीची हत्या करून मृतदेह त्या ठिकाणी टाकला असल्याची शक्यता आहे. त्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.मृतदेह आढळलेले घटनास्थळ हे नेरुळ की सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे निश्चित होत नव्हते. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास काहीसा उशीर झाल्याने पामबीचवर बघ्यांची गर्दी झाली होती. अखेर हा तपास नेरुळ पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.