ऑनलाइन शिक्षणात अश्लील चित्रफीत प्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 12:26 IST2021-08-04T12:25:41+5:302021-08-04T12:26:37+5:30
Crime News: खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या (केटीईएस स्कूल) शैक्षणिक झूम ॲपवर ऑनलाईन वर्ग सुरु असताना अश्लील चित्रफीत सुरू झाली.

ऑनलाइन शिक्षणात अश्लील चित्रफीत प्रकरणी गुन्हा दाखल
राजगुरुनगर : खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या (केटीईएस स्कूल) शैक्षणिक झूम ॲपवर ऑनलाईन वर्ग सुरु असताना अश्लील चित्रफीत सुरू झाली. या प्रकरणी खेड पोलिसांनी दखल घेतली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी याविषयी माहिती दिली. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर मंगळवारी गुरव यांनी शाळेत जाऊन या प्रकाराची चौकशी केली. संबंधित शिक्षक, या झूम ॲपवर सहभागी झालेले विद्यार्थी, तसेच शाळेतील सर्व कर्मचारीवर्गाची चौकशी केली. याबाबत सायबर क्राईमअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून शाळेचा शैक्षणिक ॲपवरील डाटा जप्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेने मंगळवारी शैक्षणिक ॲपच बंद ठेवून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन वर्ग देखील घेतला नाही. पुणे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले, याबाबतचा अहवाल पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.