जयपूरमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मुलीच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिची हत्या केल्याचा आरोप करत मुलीच्या घरच्यांनी केला. मुलीच्या वडिलांनी दावा केला की, घटनेच्या काही वेळापूर्वी मुलीने आपल्या चुलत भावाला फोन करून तिची हत्या होणार असल्याची भीती व्यक्त केली होती आणि तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या.
रामनगरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता हर्षिताचा मृतदेह सीबीआय कॉलनीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पती पंकजने तिला जयपूरिया रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी हर्षिताला मृत घोषित केलं. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हर्षिताच्या काकांना फोन करून मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर हर्षिताने आपल्या मामाचा मुलगा लोकेश याला मृत्यूदिवशी फोन केल्याचं समोर आलं.
१५ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता तिने लोकेशला फोन केला होता आणि म्हणाली - "भाऊ... पंकज आणि सासरचे लोक मला मारून टाकतील, त्यांना पैसे द्या, मला तुमच्याकडे यायचं आहे हे तू पप्पांना सांग." एसीपी सांगानेर विनोद कुमार शर्मा यांनी सांगितलं की, या घटनेनंतर वडील अशोक तंवर यांच्या वतीने रामनगरिया पोलrस ठाण्यात पंकज आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंड्यासाठी हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांचा आरोप आहे की, मुलीचा प्रेमविवाह आम्ही मान्य केल्यानंतर ती पतीसोबत आमच्या घरी येऊ लागली. याच दरम्यान, जावई पंकज आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी हर्षिताचा छळ सुरू केला. हुंड्याच्या मागणीवरून झालेल्या मारहाणीची बाब मुलगी हर्षिताने बराच काळ घरच्यांकडून लपवून ठेवली होती. पती दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा आणि हुंडा आणण्यासाठी धमकी द्यायचा. पंकजच्या कुटुंबीयांनीही हुंड्यासाठी छळ करून घटस्फोटासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.