भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:58 IST2025-10-31T17:57:31+5:302025-10-31T17:58:13+5:30
female journalist attacked by two bikers: मध्यरात्री एका महिला पत्रकारावर दोन स्कूटरस्वारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
female journalist attacked by two bikers: नोएडामध्ये मध्यरात्री एका महिला पत्रकारावर दोन स्कूटरस्वारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रात्री सुमारे १२ वाजून ४५ मिनिटांनी घडली. ही महिला पत्रकार नोएडातील आपल्या ऑफिसमधून दिल्लीतील वसंत कुंज येथे घरी जात होती. दोन पुरुषांनी तिच्या कारचा बराच वेळ पाठलाग केला आणि तिने कार न थांबवल्यामुळे त्यांनी तिच्या वाहनाची काच फोडली. त्यानंतर बऱ्याच घटना घडल्या आणि अखेर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पत्रकार एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीत कार्यरत आहे. ती नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवरून फोर्ड फिगो कारने प्रवास करत असताना, दोन स्कूटरस्वारांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्यांनी वारंवार तिची कार थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु पत्रकाराने थांबण्यास नकार दिला. अखेर त्या दोघांपैकी एकाने लाकडी वस्तूने तिच्या कारची मागील काच फोडली.
संकटाच्या क्षणी, तिने धाडस दाखवत आरोपींचे चित्रीकरण केले आणि कार वेगाने पुढे नेली. डीएनडी फ्लायओव्हरपर्यंत त्यांनी तिचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर तिने आश्रम परिसरात पोहोचल्यावर पोलिसांना फोन करून मदत मागितली. लाजपत नगर येथे काही टॅक्सी चालकांनी तिची स्थिती ओळखून तिला मदत केली, मात्र तेव्हा आरोपी पळून गेले.
पत्रकाराने तत्काळ सनलाईट कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.