आईला मारहाण करणाऱ्या वडिलांवर मुलानेच केला प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 19:34 IST2020-07-17T19:22:42+5:302020-07-17T19:34:40+5:30
अरुण हिरालाल गुडे (५०) असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर दीपक अरुण गुडे (२२) रा. आंबेडकर वॉर्ड, चांदणी चौक, भंडारा असे आरोपी मुलाचे नाव आहे.

आईला मारहाण करणाऱ्या वडिलांवर मुलानेच केला प्राणघातक हल्ला
भंडारा : आईला वडिलांकडून बेदम मारहाण होत असल्याचे पाहून असाह्य होवून एका मुलाने वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरातील आंबेडकर वॉर्डात शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. वडिलांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मुलाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
अरुण हिरालाल गुडे (५०) असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर दीपक अरुण गुडे (२२) रा. आंबेडकर वॉर्ड, चांदणी चौक, भंडारा असे आरोपी मुलाचे नाव आहे. अरुण आणि पत्नी वेगवेगळे राहतात. पत्नीसोबत दीपक नावाचा मुलगा राहतो. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अरुण पत्नीच्या घरी गेला. क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु झाला. या वादात त्याने पत्नीला मारहाण सुरु केली. दीपकने मध्यस्ती करुन वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु वडील ऐकत नव्हते, उलट आईला अधिक जोराने मारहाण करायला लागले. त्यामुळे असाह्य होवून दीपक ने चाकूने वडील अरुणवर चाकूने वार केला. हा वार मानेवर आणि पाठीवर लागून खोल जखमा झाल्या. या घटनेनंतर अरुणला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर वडिलांवर हल्ला करणारा दीपक थेट भंडारा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. आपण वडिलांवर चाकूने वार केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.