मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:44 IST2025-07-16T14:43:53+5:302025-07-16T14:44:28+5:30
Gujarat Crime: एका वडिलांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलीला नर्मदा कालव्यात फेकून देऊन तिची हत्या केली. कारण त्यांना मुलगा हवा होता.

फोटो - आजतक
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील कपडवंजमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलीला नर्मदा कालव्यात फेकून देऊन तिची हत्या केली. कारण त्यांना मुलगा हवा होता. या क्रूर घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
३५ वर्षीय अंजनाचं ११ वर्षांपूर्वी विजय सोलंकीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना भूमिका (७) आणि हेतल (३) नावाच्या दोन मुली झाल्या. पण विजय मुलींचा तिरस्कार करायचा आणि मुलासाठी तो क्रूर झाला होता. मुलाच्या हव्यासापोटी विजय इतका आंधळा केला की एके दिवशी त्याने स्वतःच्या मुलीला मारण्याचा भयंकर कट रचला.
१० जुलैच्या रात्री विजयने दीपेश्वरी मातेच्या दर्शनाच्या बहाण्याने अंजना आणि मोठी मुलगी भूमिका यांना त्यांच्या बाईकवरून नेलं. परत येत असताना, तो कपडवंजच्या वाघावत परिसरातील नर्मदा कालव्याच्या पुलावर थांबला आणि अचानक भूमिकाला कालव्यात फेकून दिलं. अंजनाने विरोध केला तेव्हा विजयने तिला घटस्फोट देण्याची धमकी दिली आणि तिला बाईकवरून तिच्या माहेरी सोडलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी अंजनाने तिच्या मुलीचा शोध घेतला तेव्हा त्याच ठिकाणी मुलीची चप्पल सापडली आणि नंतर पोलिसांनी भूमिकाचा मृतदेह ताब्यात घेतला. सुरुवातीला विजयने दावा केला की, मुलगी मासे पाहताना कालव्यात पडली, परंतु अंजनाने न घाबरता तिच्या भावांना सत्य सांगितलं. यानंतर आंतरसुबा पोलीस ठाण्यात विजयविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान विजयने गुन्हा कबूल केला आहे. मुलगा नसल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि म्हणूनच त्याने आपल्या मुलीला मारण्याचा कट रचला होता, असंही सांगितलं. पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली आहे. ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.