दारू दुकानदारास ब्लॅकमेलकरून खंडणी उकळणारे पितापुत्र अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 18:07 IST2019-10-16T18:02:17+5:302019-10-16T18:07:43+5:30
पिता-पुत्राला पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले.

दारू दुकानदारास ब्लॅकमेलकरून खंडणी उकळणारे पितापुत्र अटकेत
औरंगाबाद: त्रिमूर्ती चौकातील सरकारमान्य दारू दुकान नियमाबाह्यपणे बीडबायपासवर स्थलांतरीत केले असून तुमची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करतो,अशी धमकी देत दुकानमालकाकडून ५० हजार रुपये उकळल्यानंतर पुन्हा ३ लाख ९२ हजार रुपये खंडणी स्वरूपात घेताना पिता-पुत्राला पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई बीड बायपास रोडवर बुधवारी दुपारी करण्यात आली.
जगन सुकाजी किर्तीशाही (५५,रा.संसारनगर) आणि मिलिंद जगन किर्तीशाही (३२)अशी अटकेतील आरोपी पिता-पुत्राचे नाव आहे. आरोपी जगन हे साप्ताहिक दैनिक जयभीम मिशनचे संपादक आहेत. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार प्रदीप लालचंद मणकानी (४९,रा. मित्रनगर)यांचे बीड बायपासवरल लक्की वाईन शॉप नावाचे देशी-विदेशी दारू विक्रीचे ी दुकान आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी हे दुकान त्रिमूर्ती चौकातून बायपासवर स्थलांतरीत केले आहे. पंधरा दिवसापूर्वी जगन हा प्रदीप यांच्या दारू दुकानात गेला. त्यावेळी त्याने माहिती अधिकारांतर्गत राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाकडून मागविलेल्या माहितीची कागदपत्रे त्यांना दाखवून तो त्यांना म्हणाला की, देशी दारू दुकान एक किलोमिटरच्या आत असताना तुम्ही हे दुकान स्थलांतरीत कसे केले. तुमची तक्रार करील,असे धमकावत पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.
जगनने तक्रार केल्यास पुन्हा त्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी वेळ जाईल, ही बाब लक्षात घेऊन प्रदीप यांनी ५ आॅक्टोबर रोजी जगनला पन्नास हजार रुपये दिले. तक्रार करू नको,अशी विनंती केली. दरम्यान आरोपींनी तक्रारदार यांचे भाऊ राजू मणकानी यांना फोन करून पैशाची मागणी केली. आणि दुपारी २ वाजता बायपासवर पैसे घेऊन बोलावले आणि त्याबदल्यात तक्रारदार यांच्या दुकानासंबंधी फाईल देतो, असे त्याने सांगितले. प्रदीप यांना आरोपीला खंडणी देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविली.
अन अडकले सापळ्यात
तक्रार प्राप्त होताच पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे, सहायक आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, विनायक कापसे, मीरा चव्हाण, कर्मचारी मच्छिंद्र सोनवणे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, जालिंदर मांटे, रवी जाधव, नितेश जाधव, कमल तारे आणि माया उगले विशेष पोलीस अधिकारी स्वप्नील विटेकर यांच्या पथकाने बायपासवर सापळा रचला तेव्हा आरोपी पिता-पुत्राला प्रदीपयांच्याकडून खंडणी घेताना रंगेहात पकडले.