"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:11 IST2025-09-11T11:10:31+5:302025-09-11T11:11:23+5:30
राजदीप एका इमिग्रेशन कंपनीचा मालक होता आणि सेक्टर-८० मध्ये भाड्याच्या घरात राहत होता.

फोटो - ndtv.in
पंजाबमधील मोहालीतील सेक्टर-६८ येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत आलेल्या एका इमिग्रेशन कंपनीच्या मालकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. राजदीप असं या व्यक्तीचं नाव असून तो मोगा येथील रहिवासी होता. राजदीपने बँकेच्या बाथरूममध्ये आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी बँकेच्या आत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देखील मिळवले आहे. राजदीप एका इमिग्रेशन कंपनीचा मालक होता आणि सेक्टर-८० मध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याची सेक्टर-८२ मध्ये ओव्हरलँड नावाची इमिग्रेशन कंपनी आहे.
दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, राजदीप नावाच्या व्यक्तीने एचडीएफसी बँकेच्या बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. राजदीपच्या मोबाईलमधून एक व्हिडीओ देखील सापडला आहे ज्यामध्ये त्याने पंजाब पोलिसांचे एआयजी गुरजोत सिंह यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. राजदीपने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, एआयजीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमकावलं आहे आणि सतत त्रास देत आहेत. म्हणूनच तो आत्महत्या करत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट देखील जप्त केली. गुरजोत सिंहविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कारवाई केली जात आहे.
सुसाईड नोटमध्ये राजदीपने सर्वात आधी त्याचे वडील, पत्नी आणि मुलाची माफी मागितली आहे. राजदीपने लिहिलं आहे, बाबा, मला माफ करा. छवि, तूही मला माफ कर. माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. ४ जणांनी माझे सर्व पैसे लुटले आहेत आणि मला धमकावत आहेत. एकत्र काम करणाऱ्या समीर, रिंकू आणि सायनाने माझी फसवणूक केली आहे. रिंकू आणि सायनाने ४० लाखांचं नुकसान केलं आहे.
राजदीपने आपल्या नोटमध्ये पुढे लिहिलं आहे की, समीर अग्रवालकडून २.४६ कोटी रुपये घ्यायचे आहेत, तर हे ३.५ कोटी गुरदियाल काकाचे आहेत. मी चार महिन्यांपासून पैसे मागत आहे पण तो मला देत नाही. बाबा, माझे पार्टनर थिंद सर यांना हे सगळं माहीत आहे की माझे कोणाशीही जास्त व्यवहार नाहीत, जे काही छोटे-मोठे हिशोब आहेत ते थिंद सरांना माहीत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.