आधी बिअर, नंतर 30 हजार रुपये मागितले; संतापलेल्या वडिलांनी मुलाची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 23:09 IST2024-12-07T22:19:04+5:302024-12-07T23:09:11+5:30
वडील वृंदावन नामदेव यांनी पोलिसांना सांगितले की, हेमंत हा आम्हाला रोज मारहाण करत होता.

आधी बिअर, नंतर 30 हजार रुपये मागितले; संतापलेल्या वडिलांनी मुलाची केली हत्या
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील हनुमानगंज पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळलेल्या वडिलांनी त्याची दोरीने गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी वडील वृंदावन नामदेव यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत असे मृत मुलाचे नाव असून तो मानसिक आजारी होता. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले होते. यासाठी तो घरच्यांकडे पैसे मागत होता. पैसे न दिल्यास तो आई-वडिलांना मारहाण करत होता.
वडील वृंदावन नामदेव यांनी पोलिसांना सांगितले की, हेमंत हा आम्हाला रोज मारहाण करत होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याने पहिल्यांदा आमच्याकडे जबरदस्तीने बिअर मागितली. त्यानंतर आम्ही त्याला ती आणून दिली. यानंतर हेमंत 30 हजार रुपयांची मागणी करत होता. त्यावेळी त्याला आम्ही नकार दिल्याने त्याने आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, सतत भांडण करत असल्यामुळे त्याच्या वृत्तीला आम्ही कंटाळलो होतो, असे आरोपी वडिलांनी सांगितले
याचबरोबर, हेमंतने घरातील सर्व सामानही फोडले आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केल्याचे वृंदावन नामदेव यांनी पोलिसांना सांहितले. दरम्यान, वृंदावन नामदेव हे शिंपी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील वृंदावन नामदेव यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला
मृत हेमंत हा त्याचे वडील वृंदावन नामदेव आणि कुटुंबासह बाल बिहार येथे राहत होता. तो मानसिक आजारी होता. त्याला ड्रग्जचेही व्यसन होते. त्यांचे वडील वृंदावन नामदेव कपडे शिवण्याचे काम करतात. हेमंतची आई दुर्गाबाई यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. तसेच, पोलिसांनी हेमंतचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे, असे पोलीस अधिकारी अवधेश सिंह भदौरिया यांनी सांगितले.