सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:41 IST2025-10-16T14:39:10+5:302025-10-16T14:41:02+5:30
संपूर्ण कुटुंबाच्या मदतीने गरजू आणि श्रीमंत नवरदेवांना फसविणाऱ्या 'काजल' नावाच्या या नवरीला राजस्थान पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम येथून अटक केली आहे.

सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
लुटेरी दुल्हनचे अनेक किस्से ऐकले असतील, पण राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातून समोर आलेल्या एका हायप्रोफाईल लुटेरी टोळीच्या प्रमुख 'नवरी'ला अखेर एका वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या मदतीने गरजू आणि श्रीमंत नवरदेवांना फसविणाऱ्या 'काजल' नावाच्या या नवरीला राजस्थान पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम येथून अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सीकर जिल्ह्यातील दांतारामगड पोलीस ठाण्यात ताराचंद जाट यांच्या दोन मुलांनी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. ताराचंद यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची भेट जयपूर येथे भगत सिंह नावाच्या व्यक्तीशी झाली. भगत सिंहने ताराचंद यांच्या दोन अविवाहित मुलांचे लग्न आपल्या दोन मुली - काजल आणि तमन्ना यांच्याशी करून देण्याचा प्रस्ताव दिला. लग्नाची बोलणी झाल्यावर भगत सिंहने तयारी आणि खर्चाच्या नावाखाली ताराचंद यांच्याकडून तब्बल ११ लाख रुपये घेतले.
लग्नाच्या तिसऱ्या दिवशी झाली फरार
ताराचंद यांनी विश्वासाने ही रक्कम भगत सिंहला दिली. ठरल्यानुसार, २१ मे २०२४ रोजी खाचरियावास येथील गोविंद हॉस्पिटलच्या गेस्ट हाऊसमध्ये ताराचंद यांच्या दोन्ही मुलांचे काजल आणि तमन्ना यांच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न झाले. लग्नानंतर दोन दिवस भगत सिंहचे कुटुंब ताराचंद यांच्यासोबत राहिले. मात्र, तिसऱ्या दिवशी हे सर्व लोक अचानक घरातून गायब झाले.
आरोप आहे की, दोन्ही नववधू आणि त्यांच्या कुटुंबाने घरातून दागिने, रोकड आणि कपडे घेऊन पलायन केले. या घटनेने ताराचंद यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आणि सामाजिक धक्का बसला. त्यांनी हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली.
संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
पोलिसांनी तपासादरम्यान काजलचे वडील भगत सिंह, आई सरोज, बहीण तमन्ना आणि भाऊ सूरज यांना यापूर्वीच अटक केली होती. मात्र, काजल गेल्या एका वर्षापासून पोलिसांना चकमा देत होती. आता तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल्सच्या मदतीने सीकर पोलिसांनी तिचा माग काढला. ती हरियाणातील गुरुग्राम येथे सरस्वती एन्क्लेव्ह, गली नंबर दोन येथील एका घरात अंकित नावाच्या व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत होती. तेथून तिला अटक करण्यात आली आहे.
पतीसोबत शारीरिक संबंधही ठेवले नव्हते!
पोलिसांच्या चौकशीत काजलने खुलासा केला की, तिचा पिता भगत सिंह हा या संपूर्ण टोळीचा मास्टरमाईंड आहे. हे लोक अशा श्रीमंत कुटुंबांना लक्ष्य करायचे, जिथे मुलांची लग्ने होत नसत. त्यांची दोन्ही मुले- काजल आणि तमन्ना यांना अविवाहित असल्याचे सांगून लोकांचा विश्वास जिंकला जात असे.
या लुटेरी टोळीने राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारे बनावट लग्ने करून अनेकांना फसवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लग्नानंतर दोन-तीन दिवसांच्या रितीरिवाजांमध्ये वेळ काढला जात असे आणि या दरम्यान दोन्ही नववधू आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधही ठेवत नसत. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.