विमानतळावर मुलाला आणायला गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 19:19 IST2019-11-11T19:01:09+5:302019-11-11T19:19:54+5:30
गोव्यात दोन कारमध्ये अपघातात एकाच मृत्यू; अन्य सहाजण जखमी

विमानतळावर मुलाला आणायला गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू
मडगाव - गोव्यातील वाशे - लोटली येथे आज पहाटे दोन कारमध्ये अपघात होऊन आल्टो कारचे चालक फ्रान्सिस्को फर्नांडीस (५७) हा जागीच ठार झाला तर दुसऱ्या कारमधील चालक अमर नाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळात उपचार चालू आहे. आज पहाटे तीन वाजता हा अपघात घडला. यात दोन्ही कारमधील अमरसह सहाजण जखमी झाले. फ्रान्सिस्कोचा मुलगा विदेशातून आला होता. त्याला आणण्यासाठी ते दाबोळी येथील विमानतळावर जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या बोलिनो कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यात फ्रान्सिस्कोला जागीच मरण आले.
मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर यांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. अपघात प्रकरणी कारचालक अमर नाईक याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. भारतीय दंड संहितेंच्या २७९ ,३३७ व ३०४ (अ) कलमाखाली नाईक याच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फ्रान्सिस्को फर्नांडीस हा पंचवाडी - शिरोडा येथून असून, तो आपल्या आल्टोकारमधून दाबोळीच्या दिशेने निघाला होता. कारमध्ये त्याचा मुलगा रिचर्ड, वाग्दत सून मोनिका फर्नांडीस या होत्या तर अमर नाईक हा बोलेरो कारमधून वास्कोहून फोंडयाच्या दिशेला जात होता. त्याच्याकारमध्ये फ्रान्सिस फर्नांडीस, अक्षय किनळेकर व सान्वी नाईक या होत्या. पुढील वाहनाला अमर नाईक हा ओव्हटेक करीत असताना त्याने समोरुन येणाऱ्या आल्टोला जोरदार धडक दिली. अपघात कारमधील सर्वजण जखमी झाले. यातील रिचर्ड व मोनिका यांना उपचारानंतर इस्पितळातून घरी पाठवून देण्यात आले. तर, अक्षय किनळेकर व सान्वी नाईक यांच्यावर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचार चालू आहे.