पावसाने हूल दिल्याने तिबार पेरणीचं संकट, शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 20:05 IST2021-07-09T19:29:27+5:302021-07-09T20:05:18+5:30
farmer suicide: पावसाने डोळे वटारल्याने तिबार पेरणीच्या संकट ओढावल्याने तालुक्यातील कारखेड येथील शेतकरी दाम्पत्याने ७ जुलैच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास विषारी औधष प्राशन केले होते.

पावसाने हूल दिल्याने तिबार पेरणीचं संकट, शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या
चिखली - पावसाने डोळे वटारल्याने तिबार पेरणीच्या संकट ओढावल्याने तालुक्यातील कारखेड येथील शेतकरी दाम्पत्याने ७ जुलैच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास विषारी औधष प्राशन केले होते. या दाम्पत्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असताना ८ जुलैच्या रात्री ९ च्या सुमारास पतीचा तर रात्री दोनच्या सुमारास पत्नीचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील कारखेड येथील शेषराव भगवान मंजुळकर (६०) आणि जनाबाई शेषराव मंजुळकर (५१) या शेतकरी दाम्पत्याने तिबार पेरणीचे सकंट उद्भवल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत ७ जुलैच्या रात्री विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ८ जुलैच्या रात्री ९ व २ वाजेच्या सुमारास एकापाठोपाठ एक याप्रमाणे या शेतकरी दाम्पत्यांची प्राणज्योत मालवली. मृतक शेतकरी दाम्पत्याकडे केवळ दोन एकर शेती होती. गाठीशी असलेले सर्वकाही पणाला लावून त्यांनी पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही. त्यामुळे उसनवारी करून दुबार पेरणी त्यांना करावी लागली होती. मात्र, दुसऱ्यांदाही पेरणी उलटल्याने हे शेतकरी दाम्पत्य तणावाखाली होते. त्यातच मृतक जनाबाई मंजुळकर यांना अर्धांगवायुचा देखील त्रास होता. मात्र, कसेबसे जीवन कंठत असताना निर्सगाने घोर निराशा केल्याने आलेल्या नैराश्येतून त्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. मृतक शेतकरी दाम्पत्यास दोन मुले व चार मुली आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.