माणुसकीला काळिमा फासणारी आणि नात्यांमधील ओलावा संपल्याची साक्ष देणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून समोर आली आहे. किरकोळ वादातून आणि टोमण्याला उत्तर देण्यासाठी एका काका-काकूने आपल्याच ९ वर्षांच्या सख्ख्या पुतण्याची गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाचा मृतदेह घाघरा नदीत फेकून दिला. "तू कायम वांझ राहणार," या जावेच्या एका टोमण्याने हा भयंकर गुन्हा घडल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
बलिया जिल्ह्याच्या सहतवार पोलीस ठाणे हद्दीतील सिंगही गावात ही घटना घडली. चंदन प्रजापती यांचा ९ वर्षांचा मुलगा २५ जानेवारी रोजी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलाचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर हताश झालेल्या पित्याने पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुलाच्या गायब होण्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती आणि कुटुंबाचे रडारडून हाल झाले होते.
५ दिवसांनी नदीत सापडला मृतदेह
तपासादरम्यान, घटनेच्या पाच दिवसांनंतर पोलिसांना घाघरा नदीत एका लहान मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी तातडीने चंदन प्रजापती यांना पाचारण केले. वडिलांनी पाहताच आपल्या काळजाच्या तुकड्याला ओळखले आणि परिसरात एकच हंबरडा फोडला गेला. सुरुवातीला हा अपघात वाटत असला, तरी शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या संशयाने तपासाची चक्रे फिरली.
टोमण्याने घेतला बळी: असा रचला हत्येचा कट
एएसपी बलिया दिनेश कुमार शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. मुलाच्या आईने आपल्या जावेला 'तू वांझ आहेस आणि आयुष्यभर तुला मूल होणार नाही' असा टोमणा मारला होता. हा अपमान जाऊ आणि तिच्या पतीच्या जिव्हारी लागला.
सूडाच्या भावनेने पेटलेल्या काका-काकूने २५ जानेवारी रोजी मुलाला चॉकलेट किंवा खेळाचे आमिष दाखवून फूस लावून घरापासून ३ किलोमीटर दूर नदीकिनारी नेले. तिथे एकांतात मुलाची निर्घयपणे हत्या केली आणि मृतदेह नदीत फेकून दिला.
आरोपींना बेड्या
पोलिसांनी संशयावरून मुलाच्या सख्ख्या काका आणि काकूला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात संताप व्यक्त केला जात आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a couple murdered their 9-year-old nephew after being taunted about infertility. They lured him away and dumped his body in a river to conceal the crime. Police have arrested the perpetrators.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक दंपत्ति ने बांझपन के ताने से नाराज़ होकर अपने 9 वर्षीय भतीजे की हत्या कर दी। उन्होंने उसे बहला-फुसलाकर दूर ले गए और अपराध छिपाने के लिए उसके शव को नदी में फेंक दिया। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर लिया है।