भोंदूबाबाचा युवतीवर अत्याचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 05:39 IST2019-09-29T05:39:46+5:302019-09-29T05:39:53+5:30

कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-पाचूबंदर परिसरात उघडकीस आला आहे.

fake baba Torture young girl! | भोंदूबाबाचा युवतीवर अत्याचार!

भोंदूबाबाचा युवतीवर अत्याचार!

वसई : कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-पाचूबंदर परिसरात उघडकीस आला आहे. ग्लेन सुभाष डिक्रूज (४०) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी गेल्या वर्षभरापासून कौटुंबिक समस्येने मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. हीच संधी साधून ग्लेन डिक्रूज याने ‘मी तुझा गुरू असून, तुझ्या सर्व अडचणी दूर करून तुझ्या कुटुंबाला आनंद प्राप्त करून देईन,’ असे तिला सांगितले. ती त्याच्या बोलण्यास भुलली. आरोपीने तिला वेगवेगळ्या प्रकारे सहानुभूती दाखवून जवळ केले. त्यानंतर, आॅगस्ट, २०१८ ते आॅगस्ट, २०१९ या कालावधीत कळंब, रानगाव आदी ठिकाणी नेऊन त्याने तिची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास गुरूचा प्रकोप होईल व याचा तुला मोठा त्रास होईल, अशी धमकीही दिली.
१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
अखेर या त्रासाला कंटाळून सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडितेने वसई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला १ आॅक्टोबरपर्यंत कोठडी दिली आहे.

Web Title: fake baba Torture young girl!