फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 17:02 IST2025-11-23T17:01:45+5:302025-11-23T17:02:24+5:30
एका सायबर गुन्हेगार महिलेने नोएडातील व्यावसायिकाला तब्बल २.९० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

AI Generated Image
श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून आणि फेसबुकवर मैत्री करून एका सायबर गुन्हेगार महिलेने नोएडातील व्यावसायिकाला तब्बल २.९० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडून हा मोठा सायबर फ्रॉड करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सेक्टर-११ मध्ये राहणारे आणि ग्रेटर नोएडा येथे पुठ्ठा उत्पादन कारखाना चालवणारे व्यापारी नितिन पांडे हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. त्यांनी सेक्टर-३६ येथील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली अन्...
व्यापारी नितिन पांडे यांच्यासोबत हा प्रकार २५ जूनपासून सुरू झाला. त्यांना फेसबुकवर सुनेहा शर्मा नावाच्या महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने आपण जबलपूरची रहिवासी असल्याचे सांगितले. सामान्य गप्पांनंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली आणि लवकरच महिलेने नितीन यांना व्हॉट्सॲपवर बोलण्यासाठी प्रवृत्त केले. जवळपास १० दिवसांच्या सातत्यपूर्ण बोलण्यातून या महिलेने नितीन यांचा विश्वास पूर्णपणे जिंकला.
विश्वास संपादन झाल्यानंतर या महिलेने नितीन यांना 'FINALTO' नावाच्या एका कथित फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तिने तब्बल १५२०% पर्यंत नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट्स आणि बनावट ट्रेडिंग रिपोर्ट्स पाठवले. या प्लॅटफॉर्मवर जलद कमाईची संधी असल्याचे सांगत तिने त्यांना जाळ्यात ओढले.
लाखो, करोडोंची गुंतवणूक
४ जुलै रोजी नितीन यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये गुंतवले. पैसे गुंतवताच महिलेने त्यांना तात्काळ बनावट नफ्याचे आकडे पाठवायला सुरुवात केली, ज्यामुळे नितीन यांचा विश्वास अधिक मजबूत झाला. महिलेच्या भूलथापांना बळी पडून नितीन यांनी हळूहळू मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. त्यांनी नातेवाईकांकडून कर्ज घेतले, बँकेकडून लोन घेतले आणि एकूण २.९० कोटी रुपये या बोगस प्लॅटफॉर्मवर जमा केले. सुरुवातीला प्लॅटफॉर्मवर त्यांची ट्रेडिंग रक्कम वाढत असल्याचं दिसत होतं आणि ती वाढून ७.९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
विड्रॉल फेल झालं अन् महिलेनं ब्लॉक केलं!
एवढी मोठी कमाई झाल्याच्या विश्वासावर नितीन यांनी जेव्हा ही वाढलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रक्रिया अयशस्वी झाली. वारंवार प्रयत्न करूनही त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर नितीन यांनी महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिने फोन उचलणे बंद केले आणि काही वेळातच फेसबुक तसेच व्हॉट्सॲपवरून त्यांना ब्लॉक केले.
आपण मोठ्या सायबर टोळीच्या जाळ्यात अडकल्याचे आणि आपली संपूर्ण कमाई गमावल्याचे लक्षात येताच नितीन यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने सायबर क्राइम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, आरोपी सायबर गँगचा डिजिटल व्यवहार तपासला जात आहे.