माणुसकीला काळिमा फासणारी घटना; टेरेसवर सापडले मृत नवजात अर्भक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 18:25 IST2018-11-22T18:19:30+5:302018-11-22T18:25:33+5:30
तेथे सीसीटीव्ही नसल्याने गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; टेरेसवर सापडले मृत नवजात अर्भक
नालासोपारा - नालासोपारा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका नवजात अर्भकाची हत्या करून त्याचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून इमारतीच्या टेरेसवर फेकून देण्यात आल्याने नालासोपारा येथे रांजणपाडय़ात खळबळ उडाली होती. घटनास्थळ असलेल्या साक्षी इमारतीच्या टेरेसवर हे मृत अर्भक सापडले. मात्र, तेथे सीसीटीव्ही नसल्याने गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील रांजणपाडा येथे साक्षी इमारतीच्या टेरेसवर एका स्त्री जातीचे नवजात अर्भकाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फेकून देण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॅनियल बने यांना मिळाली. हा मृतदेह गेल्या 2 दिवसांपासून तेथेच पडून असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. इमारतीत एका फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असल्याने टेरेस उघडा ठेवण्यात आला होता. याच गोष्टीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने हा मृतदेह येथे फेकून दिल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बने यांनी वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल 2 दिवसात मिळणार आहे. सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडथळे निर्माण झाले असले तरी गुन्हेगारांना अटक केली जाईल असेही बने म्हणाले. पोलीस तपासादरम्यान रांजणपाडा परिसरातील मॅटर्निटी होमवर करडी नजर आहे.