'वेळ लागेल पण माफी मिळणार नाही'; दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांच्या एन्काऊंटरनंतर गोल्डी ब्रार टोळी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:40 IST2025-09-18T17:36:52+5:302025-09-18T17:40:38+5:30
दिशा पटानीच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा एन्काऊटर झाल्यानंतरही पुन्हा धमक्या येत आहेत.

'वेळ लागेल पण माफी मिळणार नाही'; दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांच्या एन्काऊंटरनंतर गोल्डी ब्रार टोळी संतप्त
Disha Patani House Firing Case: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलोपार्जित घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी गाझियाबादच्या टेक्नो सिटी परिसरात दोन्ही गोळीबार करणाऱ्यांना एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. दोघेही रोहित गोदरा-गोल्डी ब्रार टोळीचे सदस्य होते. मात्र यानंतरही रोहित गोदराकडून धमक्या येणं सुरुच आहे. या एन्काऊंटरनंतर गोदराने पुन्हा एकदा माफी मिळणार नाही म्हणत इशारा दिला आहे.
बरेली येथे अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेतील दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने गाझियाबाद येथे झालेल्या चकमकीत ठार मारले. या कारवाईनंतर, गँगस्टर गोल्डी ब्रार टोळीचा सदस्य रोहित गोदारा याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दोन्ही आरोपींच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. रोहित गोदराने एन्काऊंटर करण्याचा सूड घेणार असल्याचे म्हटलं आहे. यासाठी वेळ लागेल, पण माफी मिळणार नाही, असाही इशारा रोहित गोदराने दिला.
गोदाराने एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या आरोपींना शहीद म्हणत हे खूप मोठे नुकसान असल्याचे म्हटले. "भावांनो, आजची ही चकमक आपल्यासाठी खूप मोठी जीवितहानी आहे. मी तुम्हाला सांगतो की चॅनेल त्यांना मारल्याच्या बातम्या देत आहेत. पण ते मारले गेले नाहीत तर शहीद झाले आहेत. या भावांनी त्यांच्या धर्मासाठी आपले प्राण अर्पण केले. थोडी लाज बाळगा. तुम्ही एका बाजूने सनातन-सनातन ओरडता आणि जो सनातनसाठी लढतो तो मारला जातो. हा न्याय नाही. हा एन्काउंटर नाही, सनातन हरले आहे. धर्मासाठी लढणारे मारले जातात. आपल्या शहीद बांधवांना न्याय मिळवून द्या. जर आपण धर्मासाठी लढू शकतो, तर आपण शहीद बांधवांसाठी असे काम करू शकतो ज्याची ते कल्पनाही करू शकत नाहीत. यात कोणीही सहभागी असो, तो कितीही श्रीमंत असो किंवा शक्तिशाली असो. याला वेळ लागू शकतो, पण कोणतीही माफी मिळणार नाही," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील वडिलोपार्जित घरावर गोळीबार केला होता. हल्ल्येखोरांनी अभिनेत्री दिशा पटानीची मोठी बहीण, निवृत्त लष्करी अधिकारी खुशबू पटानी तिच्या माजी पोलिस अधिकारी वडील जगदीश पटानी आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह राहत असलेल्या कुटुंबाला लक्ष्य केले गेले. या घटनेपूर्वी ११ सप्टेंबरच्या रात्री त्याच घरात गोळीबार झाला होता. ११ सप्टेंबरचा हल्ला गोल्डी ब्रार टोळीचे सदस्य असलेल्या बागपत येथील रहिवासी नकुल आणि विजय यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. १२ आणि १३ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या हल्ल्याची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली.