शूटिंगसाठी निघालेल्या अभिनेत्रीचे अपहरण, चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार; ६ दोषींना २० वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:51 IST2025-12-12T18:51:47+5:302025-12-12T18:51:47+5:30
केरळमधील एर्नाकुलम न्यायालयाने २०१७ च्या मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात सहा जणांना शिक्षा सुनावली आहे.

शूटिंगसाठी निघालेल्या अभिनेत्रीचे अपहरण, चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार; ६ दोषींना २० वर्षांचा कारावास
Kerala Crime: २०१७ मधील चर्चित मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी एर्नाकुलम न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मुख्य आरोपी सुनील एनएस उर्फ पल्सर सुनी आणि इतर पाच दोषींना न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील सहाही दोषींना सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कायद्यातील किमान शिक्षा ठोठावण्यात आली असून, प्रत्येकावर ५०,००० चा दंडही लावण्यात आला आहे.
एर्नाकुलमच्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश हनी एम. वर्गीज यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निकालात मल्याळम अभिनेता दिलीप यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले होते, मात्र त्याच वेळी सहा आरोपींना दोषी ठरवले होते. शुक्रवारी शिक्षेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने सहाही दोषींना कठोर शिक्षा सुनावली. सुनील एनएस उर्फ पल्सर सुनी (मुख्य आरोपी), मार्टिन एंटनी, मणिकंदन बी, वीजेश वीपी, वडिवल सलीम, प्रदीप अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या दोषींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ ड, १२०ब,३४२, ३५४, ३६६, ३५४ब आणि ३५७ सह अनेक गंभीर कलमांखाली शिक्षा झाली आहे.
न्यायालयाने सर्व सहा आरोपींना समान शिक्षा ठोठावली आहे, मात्र विशेष सरकारी वकील अजयकुमार यांनी या शिक्षेवर नाखुशी व्यक्त केली आहे. "सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी न्यायालयाने केवळ किमान २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यातून चुकीचा संदेश जातो," असे मत अजयकुमार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, शिक्षेचा कालावधी वाढवण्यासाठी सरकारला अपील करण्याची शिफारस ते करणार आहेत.
शिक्षेची सुनावणी करण्यापूर्वी न्यायालयाने दोषींचे म्हणणे ऐकून घेतले. मुख्य आरोपी पल्सर सुनी याने आपल्या वृद्ध आईचा हवाला देत सहानुभूतीची मागणी केली, तर मार्टिन एंटनी आणि प्रदीप यांनी आपल्या कुटुंबाच्या अडचणी सांगत किमान शिक्षेची विनंती केली. न्यायालयाने शिक्षा कायद्याच्या तत्त्वांनुसार दिली जावी की सामाजिक अपेक्षांच्या आधारावर, असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला.
काय होती ती घटना?
१७ फेब्रुवारी २०१७ च्या रात्री ही घटना घडली, जेव्हा पीडित अभिनेत्री कोची येथून त्रिशूर येथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होत्या. आरोपींनी त्यांची कार रोखून त्यांना जबरदस्तीने दुसऱ्या गाडीत बसवले. त्यानंतर चालत्या कारमध्ये त्यांचे सामूहिक लैंगिक शोषण करण्यात आले. या हल्लेखोरांनी संपूर्ण गुन्ह्याचे व्हिडिओ शूटिंगही केले होते.
या घटनेनंतर लगेचच ड्रायव्हर मार्टिन एंटनीला अटक झाली. एका आठवड्यात मुख्य आरोपी पल्सर सुनी आणि फेब्रुवारीच्या अखेरीस इतर चार आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
अभिनेता दिलीप निर्दोष मुक्त
या प्रकरणात मल्याळम अभिनेता दिलीप यांनाही अटक करण्यात आली होती. दिलीप यांनी आपल्या कथित संबंधांची माहिती तत्कालीन पत्नीला दिल्याचा बदला घेण्यासाठी पल्सर सुनीच्या टोळीकडून हा गुन्हा करवून घेतला, असा त्यांच्यावर आरोप होता. जवळपास आठ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर, न्यायालयाने ८ डिसेंबर २०२५ रोजी दिलीप यांना त्यांच्याविरुद्ध पुरेशा पुराव्याअभावी सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. पीडित अभिनेत्रीने संपूर्ण खटल्यात धैर्याने साक्ष दिली आणि न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.