कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 23:23 IST2025-11-14T23:23:17+5:302025-11-14T23:23:52+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याच्या मुलाने आपले कर्ज फेडण्यासाठी मित्रांच्या मदतीने चक्क स्वतःच्याच अपहरणाची खोटी कथा रचली.

कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्...
मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि विचित्र घटना उघडकीस आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याच्या मुलाने आपले कर्ज फेडण्यासाठी मित्रांच्या मदतीने चक्क स्वतःच्याच अपहरणाची खोटी कथा रचली. पोलिसांनी तथाकथित अपहृत तरुणाला त्याच्या दोन मित्रांसह राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून सुखरूप पकडल्यानंतर या संपूर्ण नाटकाचा पर्दाफाश झाला.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण मंदसौरच्या शामगड येथे कार्यरत असलेले पीडब्ल्यूडी अभियंता कमल जैन यांचा २६ वर्षीय मुलगा हर्षल जैन याच्याशी संबंधित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षलने आपल्या चार मित्रांसह मिळून ही संपूर्ण योजना आखली होती. चौकशीत असे समोर आले आहे की, राजस्थानच्या कोटा येथे चहाची फ्रँचायझी चालवणाऱ्या हर्षलवर मोठे कर्ज झाले होते.
५० लाख रुपयांची खंडणी मागितली!
हे कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वतःच्याच कुटुंबाकडून ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचला. या कटाचा भाग म्हणून, हर्षलने स्वतःचे अपहरण झाल्याचे भासवून कुटुंबाला फोन करवून खंडणीची मागणी केली. खंडणीचा फोन येताच कुटुंबीयांनी तातडीने शामगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी उधळला डाव
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदसौर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सात वेगवेगळ्या पथकांची स्थापना करण्यात आली. सायबर सेलने केलेल्या सखोल तपासानंतर पोलिसांना अचूक सुगावा मिळाला. या माहितीच्या आधारावर राजस्थानच्या कोटा येथे छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी हर्षलसह त्याच्या दोन मित्रांना अटक केली.
इतर आरोपींचा शोध सुरू
या कटात सहभागी असलेले त्याचे दोन अन्य मित्र मात्र अजूनही फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या हर्षल आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांसमोर कबूल केले की, त्यांनी हे खोटे अपहरण नाटक रचले होते. कर्ज फेडणे आणि खंडणीचे पैसे आपापसात वाटून घेणे हा त्यांचा हेतू होता. सध्या पोलीस फरार असलेल्या दोन आरोपींचा कसून शोध घेत आहेत.