दारू पाजली, बारचे बिलही भरायला लावलं अन्...; रॅगिंगपासून मला वाचवा म्हणत विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 20:30 IST2025-09-22T20:28:38+5:302025-09-22T20:30:30+5:30
हैदराबादमध्ये रॅगिंगमुळे एका २२ वर्षीय विद्यार्थ्याचा जीव गेला आहे.

दारू पाजली, बारचे बिलही भरायला लावलं अन्...; रॅगिंगपासून मला वाचवा म्हणत विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं
Hyderabad Crime: हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेत इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने त्याच्या कॉलेजच्या वसतिगृहात रॅगिंग आणि छळाला कंटाळून आत्महत्या केली. दारू पार्टीचे बिल देण्यावरून झालेल्या वादात १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं. आत्महत्या करण्यापूर्वी, विद्यार्थ्याने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो घाबरलेला दिसत होता. त्याने मारहाण झाल्याचा आरोप करत पैसे देण्यास भाग पाडले गेल्याचे म्हटलं. व्हिडिओमध्ये तो मुलगा त्याच्या जीवाची याचनाही करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी रॅगिंग आणि आत्महत्येच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हैदराबादमधील सिद्धार्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील जादव साई तेजा या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येमुळे रॅगिंगचा भयानक प्रकार पुन्हा एकदा समोर आला. सोमवारी त्याचा मृतदेह त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, साई तेजाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
साई तेजा हा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. कॉलेजमधल्या सिनियर विद्यार्थ्यांना त्याला बारमध्ये दारू पिण्यास भाग पाडले आणि अंदाजे १०,००० रुपयांचे बिल त्याला भरण्यास सांगितले. त्याच्याकडे वारंवार पैसेही मागितले जात होते. तेजा या दबावामुळे निराश झाला होता आणि त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्या करण्यापूर्वी साई तेजाने एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये त्याच्या वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. "मी कॉलेजला जात असताना चार-पाच माणसे आली आणि मला धमकावत आहेत. ते पैसे मागत आहेत आणि मला मारहाण करत आहेत. मला खूप भीती वाटतेय. मला वाचवा, नाहीतर मी मरेन," असं साई तेजाने म्हटलं. व्हिडिओमध्ये तेजावर होणारा मानसिक आणि शारीरिक छळ स्पष्टपणे दिसून येतो. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर काही तासांनी सईने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, साई तेजाचे कुटुंब ३०० किलोमीटर प्रवास करून वसतिगृहात पोहोचले. रॅगिंग रोखण्यात कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि तपास सुरू केला आहे.