स्कॅममध्ये सहभाग असल्याचे सांगून वृद्धेला सव्वाकोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:05 IST2025-01-01T14:05:47+5:302025-01-01T14:05:57+5:30

याप्रकरणी गुन्हा नोंदवत उत्तर प्रादेशिक सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Elderly woman duped of Rs 1crores 25 lakh by claiming to be involved in scam | स्कॅममध्ये सहभाग असल्याचे सांगून वृद्धेला सव्वाकोटींचा गंडा

स्कॅममध्ये सहभाग असल्याचे सांगून वृद्धेला सव्वाकोटींचा गंडा

मुंबई : हैद्राबादमधील पाचशे कोटीच्या गैरव्यवहारात सहभाग आणि बँक खात्यातील रकमेचा दहशतवादासाठी वापर झाल्याचे सांगून गोरेगाव येथील ६८ वर्षीय महिलेची महिनाभर डिजिटल अरेस्टची भीती घालून फसवणूक करण्यात आली आहे. अटकेच्या भीतीपोटी महिनाभर सोबत राहणाऱ्या पतीला देखील याबाबत पीडितेने कळू दिले नाही. त्याचा फायदा घेत त्यांच्या बँक खात्यातील सव्वा कोटींवर ठगांनी हात साफ केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत उत्तर प्रादेशिक सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गोरेगाव परिसरात पतीसोबत राहणाऱ्या तक्रारदार महिलेने २०१४ मध्ये बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. नोव्हेंबर महिन्यात त्यांना एका महिलेचा कॉल आला होता. आपण रिझर्व्ह  बँक ऑफ इंडियाच्या सेवा क्रमांकावरून बोलत असल्याचे तिने सांगितले. क्रेडिट कार्डवरील रक्कम न भरल्यामुळे बँकेने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत, सर्व बँक खाती गोठवण्यात येत असल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला. महिलेने कोणतेही क्रेडिट कार्ड वापरत नसल्याचे सांगूनही थेट हैदराबाद पोलिसांशी बोला सांगून फोन ट्रान्सफर केल्याचे भासवले. त्यानंतर, कथित अधिकारी आकाश गुलाटी बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्ड गैरव्यवहारासह ५०० कोटींच्या गैरव्यवहारातही सहभाग असून त्यातील २० लाख तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. त्या क्रमांकाशी तुमचे आधार कार्ड लिंक असल्याचेही या तोतया पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच सीबीआय अधिकाऱ्याने डिजिटल अटक केल्याचे सांगून याबाबत पतीलाही सांगू नका असे सांगितले.  त्यानंतर गुलाटीचा वरिष्ठ अधिकारी म्हणून एका व्यक्तीने तक्रारदार महिलेशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्याने आपण आकाश कुल्हारी असल्याचे सांगून खात्यात जमा झालेल्या रकमेचा दहशतवादी कृत्यात वापर झाल्याचे सांगून तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवली. 

आयुष्यभराच्या कमाईवर हात साफ
महिनाभर पीडित ठगांना सांगूनच कुठेही जात होत्या, बोलत होत्या. यामध्ये त्यांनी भविष्य निर्वाह निधी, बचत खाते, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी यातून एक कोटी १८ लाख २० हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. 

बातमी वाचून भानावर...
महिनाभराने तक्रारदार महिलेने वृत्तपत्रामध्ये डिजिटल अटकेबाबतची बातमी वाचल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी हा प्रकार पतीला सांगून थेट १९३० या सायबर हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार नोंदवली.
 

Web Title: Elderly woman duped of Rs 1crores 25 lakh by claiming to be involved in scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.