उल्हासनगर : एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेची ५ जणांच्या टोळीने, बागेश्वर धाम बाबाच्या नावाने २४ लाख ६० हजाराने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी टोळक्याला अटक करून, त्यांच्याकडून ७ लाखाचा ऐवज जप्त केला. न्यायालयाने २१ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेचा ५ जणांच्या टोळक्याने, विश्वास संपादन करून, त्यांना रूम मिळून देण्याचे अमिष दाखवून सुरवातीला १० लाख रुपयांची रोख रक्कम घेतली. त्यानंतर महिलेला तुमच्यावर विघ्न आहे. बागेश्वर धाम येथे धार्मिक विधी होम हवन करावे लागेल. असे अमिष दाखवत तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण २४ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर बागेश्वर धामच्या बाबाचा प्रसाद आणल्याचे वृद्धेला सांगून मिठाईतून गुंगीच्या औषध देऊन, तीच्या हातातील सोन्याच्या बांगड्याची चोरी केली. याघटनेनंतर आपली फसवणूक झाल्याचे वृद्धेच्या लक्षात आल्यावर, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला.
विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, टोळक्या विरोधात गुन्हा दाखल केला. फसवणुकीचा प्रकार जानेवारी २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२५ या दीड वर्षाच्या काळात घडला आहे. चौकशीत वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या करिष्मा दुधानी, उषा शर्मा, लाविना शर्मा, साहिल दूध व यश शर्मा यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून ७ लाखाचा ऐवज जप्त केला. न्यायालयाने त्यांना २१ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, आरोपींनी इतर कोणाला अजून फसवले आहेत का? याचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली.