निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:13 IST2025-08-28T17:12:18+5:302025-08-28T17:13:19+5:30
ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात कथितरित्या हुंड्यासाठी मारलेल्या २८ वर्षीय निक्की भाटीच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे.

निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात कथितरित्या हुंड्यासाठी जाळून मारलेल्या २८ वर्षीय निक्की भाटीच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. निक्कीच्या माहेरचे लोक ही हुंड्यासाठी केलेली हत्या असल्याचा आरोप करत आहेत, तर सासरच्या मंडळींनी तिने स्वतःला जाळून घेतल्याचा दावा केला आहे. या प्रकरणातील गुंतागुंत वाढत असतानाच, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर ही हत्याच होती, तर निक्कीच्या माहेरच्या लोकांनी तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी सासरच्यांना का दिला? आणि दोन्ही कुटुंबं अंतिम संस्कारापर्यंत शांत का होती?
या प्रकरणाला नवा ट्विस्ट देणारी एक बाब आता समोर आली आहे. आरोपी विपिन भाटीच्या शेजाऱ्याने दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या एका 'समझोत्याचा' दावा केला आहे.
‘समझोत्या’चा दावा आणि नवे प्रश्न
विपिन भाटीच्या घराशेजारी राहणारे प्रकाश प्रधान यांनी आरोपी कुटुंबाची बाजू घेत सांगितले की, ज्यावेळी निक्की भाजली, त्यावेळी तिचा पती आपल्या मुलासोबत कार स्वच्छ करत होता. वरून कंचनच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वजण वरच्या मजल्यावर धावले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रधान यांनी सांगितले की, शवविच्छेदनादरम्यान दोन्ही कुटुंबं सोबत होती, पण त्याच वेळी निक्कीच्या माहेरच्या लोकांनी हत्येचा आरोप करायला सुरुवात केली.
प्रकाश प्रधान यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर विपिनच्या कुटुंबाने निक्कीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी मागितला. सुरुवातीला निक्कीचे माहेरचे लोक यासाठी तयार नव्हते. पण विपिनचे वडील आणि समाजातील इतर लोकांनी त्यांना अनेकदा विनंती केली की, आपल्या सुनेच्या अंतिम संस्काराचा त्यांना अधिकार आहे. यानंतर निक्कीच्या माहेरच्यांनी एक अट ठेवली. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही मृतदेह अंतिम संस्कारासाठी देऊ, पण त्याबदल्यात तुम्ही वचन द्या की, जेव्हा आम्ही निक्की आणि कंचनच्या मुलांना परत घेऊन जाऊ, तेव्हा आम्हाला कोणीही थांबवणार नाही.’ दोन्ही कुटुंबं या अटीवर सहमत झाली, आणि त्यानंतर विपिनच्या मुलाने व वडिलांनी मिळून निक्कीला अग्नी दिला.
सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे दावे
घटनेच्या वेळी घराबाहेर असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की, जेव्हा निक्की भाजली, तेव्हा तिचा पती बाहेर होता. वरच्या मजल्यावरून कंचनचा आवाज आला की, निक्कीने स्वतःला आग लावून घेतली आहे. हा आवाज ऐकून विपिन धावत गेला, असे त्यांनी सांगितले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अर्जुन नावाच्या एका तरुणाने दावा केला की, निक्कीला रुग्णालयात घेऊन जात असताना तिची सासू आणि सासरेही गाडीत सोबत होते.
पोलिसांनी चार आरोपींना केली अटक
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी निक्कीची बहीण कंचनने आरोप केला की, निक्कीला तिचा पती, सासू आणि सासऱ्याने मिळून जाळून मारले. यानंतर पोलिसांनी निक्कीच्या पतीसह कुटुंबातील चार जणांना अटक केली.
या प्रकरणात निक्कीने रुग्णालयात पोलिसांना दिलेला शेवटचा जबाबही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तिने डॉक्टरांना सांगितले होते की, घरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात ती भाजली. मात्र, पोलीस तपासणीत घरात कोणत्याही स्फोटाचे पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे निक्कीचा मृत्यू कसा झाला, हे गूढ कायम आहे.