अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आठ वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 20:10 IST2021-07-16T20:10:18+5:302021-07-16T20:10:43+5:30
Murder Case : शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आठ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याच्या अवस्थेत मृतदेह त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक बंद खोलीत आढळून आला.

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आठ वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या
भिवंडी - खानावळी साठी घरी येणाऱ्या कामगाराचे आठ वर्षाच्या मुलाच्या आईशी अनैतिक संबंध असल्याने हा आठ वर्षाचा मुलगा प्रेमात अडसर ठरत असल्याने चिमुरड्याची गळा आवळून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना भिवंडीत शुक्रवारी समोर आली आहे .
भिवंडी तालुक्यातील कारिवली गावच्या हद्दीतील एका इमारती मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाचा ८ वर्षाचा मुलगा हा गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने परीसरात शोधून ही त्याचा शोध न लागल्याने अखेर भोईवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्या नुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला असता शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आठ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याच्या अवस्थेत मृतदेह त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक बंद खोलीत आढळून आला.
भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरोधात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता त्या परिसरातील संशयित जितेंद्र मधेशिया ( वय २१ वर्ष ) यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबुल केले. आरोपी जितेंद्र हा हत्या केलेल्या कुटुंबाकडे खानावळ लावून जेवण करण्यासाठी येत होता. त्यावेळी तो हत्या झालेल्या मुलाच्या आई सोबत शारिरीक लगट करीत असल्या बाबत मुलाने आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याची खानावळ बंद केली . मुलाने आपले कारस्थान सांगितल्याने आपले बिंग फुटले, याचा राग मनात ठेवून जितेंद्र याने आठ वर्षीय चिमुरड्यास खेळायच्या बहाण्याने बोलवून आपल्या सोबत चौथ्या मजल्यावर घेऊन गेला व त्या ठिकाणी त्याची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस एन चव्हाण यांनी सांगितले आहे .
चिमुरड्याची हत्या करणारा जितेंद्र मधेशिया यास अवघ्या अठरा तासात अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे . या घटने नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.