यवतमाळमध्ये आठ ऑटोरिक्षांची तोडफोड, युवकाने घातला धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:23 PM2021-06-10T23:23:59+5:302021-06-10T23:24:26+5:30

नेताजीनगरमधील ऑटो चालकांवर नवे संकट

Eight autorickshaws vandalized in Yavatmal | यवतमाळमध्ये आठ ऑटोरिक्षांची तोडफोड, युवकाने घातला धुडगूस

यवतमाळमध्ये आठ ऑटोरिक्षांची तोडफोड, युवकाने घातला धुडगूस

Next
ठळक मुद्देसदर युवक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास आहे. गुरुवारी रात्री २ वाजता हातात लोखंडी रॉड घेऊन तो आरडाओरड करीत रस्त्यावर उतरला

यवतमाळ : शहरातील नेताजीनगर भागात मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षा चालक राहतात. गुरुवारी रात्री २ वाजता या परिसरातील एका युवकाने हातात लोखंडी रॉड घेऊन ऑटोंच्या काचा फोडल्या. त्याने एका कारचीही तोडफोड केली. तब्बल तासभर तो परिसरात धुडगूस घालत होता. हा प्रकार निदर्शनास येताच शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

सदर युवक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास आहे. गुरुवारी रात्री २ वाजता हातात लोखंडी रॉड घेऊन तो आरडाओरड करीत रस्त्यावर उतरला. त्याने ऑटोला लक्ष्य करीत त्याच्या काचा फोडल्या. एकाच वेळी आठ ऑटोंची तोडफोड केली. दुचाकीसुद्धा फोडली, रस्त्यावर उभ्या असलेल्या सर्व काचा फोडून परिसरातील नागरिकांना धमकावणे सुरू केले. शहर पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाल्यानंतर तो युवक पोलिसांपुढे आला. त्याने पोलिसांनाही धमकावणे सुरू केले. त्याची मानसिक स्थिती बराेबर नसल्याचे सांगत पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्यास नकार दिला. मात्र, त्या युवकाच्या कुटुंबीयांना तंबी देण्यात आली. या पुढे असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे उपासमार झेलत असलेल्या ऑटोचालकांना आता अनलॉक होताच ऑटोच्या दुरुस्तीचा फटका बसला आहे. आर्थिक अडचणीत असताना ऑटोच्या दुरुस्तीचा खर्च करायचा कोठून असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. पावसाळ्यात ऑटो चालकांना दोन पैसे कमविण्याची संधी असते. मात्र आता फुटक्या काचा असलेले ऑटो चालवायचे कसे असा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला आहे.
 

Web Title: Eight autorickshaws vandalized in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app