Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:34 IST2025-12-19T11:34:06+5:302025-12-19T11:34:53+5:30
Anurag Dwivedi : ऑनलाईन सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने उत्तर प्रदेशचा युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर अनुराग द्विवेदीला मोठा दणका दिला आहे.

फोटो - ndtv.in
ऑनलाईन सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने उत्तर प्रदेशचा युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर अनुराग द्विवेदीला मोठा दणका दिला आहे. तपास यंत्रणेने नुकतीच अनुरागच्या उन्नाव, लखनौ आणि नवाबगंजसह एकूण नऊ ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचा तपास आता केवळ सट्टेबाजीपुरता मर्यादित राहिलेला नाही. दुबईत एका आलिशान क्रूझ शिपवर झालेला अनुराग द्विवेदीचा 'शाही विवाह' आता तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. या लग्नात अफाट खर्च करण्यात आला असून, त्यात नातेवाईकांव्यतिरिक्त काही प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. आता ईडी या सेलिब्रिटींची यादी, त्यांची उपस्थिती आणि लग्नासाठी झालेल्या खर्चाच्या सोर्सची माहिती गोळा करत आहे.
अनुराग द्विवेदीवर अवैध ऑनलाईन बेटिंग एप्सची जाहिरात आणि प्रसार केल्याचा आरोप आहे. या एप्सच्या माध्यमातून मिळालेली कोट्यवधींची कमाई त्याने 'हवाला' मार्फत दुबईतील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवल्याचा ईडीचा दावा आहे. छापेमारीत सापडलेली कागदतपत्रं 'मनी ट्रेल'कडे स्पष्ट इशारा करत आहेत.
तपासादरम्यान एजन्सीने चार अत्यंत महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये लॅम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसारख्या कारचा समावेश आहे. गाड्यांशिवाय अनेक डिजिटल उपकरणं आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रंही ताब्यात घेण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग द्विवेदी सध्या दुबईत वास्तव्यास असून ईडीने वारंवार समन्स बजावूनही तो चौकशीसाठी हजर झालेला नाही. एजन्सी आता त्याचं नेटवर्क, फंडिंग चेन आणि पार्टनर्सच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी नोंदवलेल्या फसवणूक आणि अवैध सट्टेबाजीच्या एफआयआरच्या आधारे ईडीने 'पीएमएलए' (PMLA) कायद्यांतर्गत हा तपास सुरू केला आहे.