छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 00:48 IST2025-07-19T00:45:58+5:302025-07-19T00:48:03+5:30
Uttar Pradesh Crime, Chhangur baba ED: छांगुरच्या एकूण १५ ठिकाणांवर छापे, सहकाऱ्यांच्या नावाने खरेदी केलेली मालमत्ता

छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
Uttar Pradesh Crime, Chhangur baba ED: मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमालुद्दीन उर्फ छांगुर बाबा यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली. लखनौ झोनच्या पथकाने बलरामपूर, लखनौ आणि मुंबई येथे छांगुर आणि त्याचा जवळचा सहकारी नवीन रोहरा यांच्याशी संबंधित १५ ठिकाणी छापे टाकले. उत्तर प्रदेश 'एटीएस'ने दाखल केलेल्या FIR च्या आधारे तपास सुरू करण्यात आला. त्यामध्ये बेकायदेशीर धर्मांतर, परदेशी निधी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर आरोप करण्यात आले होते. तपासात असे दिसून आले की, छांगुर बाबा बलरामपूरमधील चांद औलिया दर्ग्यावरून संपूर्ण नेटवर्क चालवत असे. असा आरोप आहे की तो अनुसूचित जाती आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत हिंदू वर्गातील लोकांना धमकावून आणि आमिष दाखवून धर्मांतर करत असे.
छांगुरच्या १५ अड्ड्यांवर ईडीने छापे टाकले
छांगुर आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित २२ बँक खात्यांची ईडीने चौकशी केली आहे. या खात्यांमध्ये ६० कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यवहार आढळले, त्यापैकी बहुतेक परकीय निधीच्या स्वरूपात आले. छापेमारीदरम्यान, ईडीला अनेक कागदपत्रे सापडली आहेत. त्यावरून हे बेकायदेशीर पैसे मालमत्ता आणि बांधकाम कामात गुंतवल्याचे उघड झाले आहे.
६० कोटींपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार उघड झाले
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मालमत्ता छांगुरने स्वतःच्या नावाने खरेदी केल्या नव्हत्या, तर नवीन रोहरा आणि नीतू रोहरा यांच्या नावाने खरेदी केल्या होत्या. जेणेकरून खऱ्या मालकाची ओळख लपवता येईल. ईडीने घटनास्थळावरून कागदपत्रे, मालमत्तेशी संबंधित दस्तावेज आणि फसवणुकीशी संबंधित पुरावे देखील जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कागदपत्रे खूप महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.