ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:33 IST2025-09-11T12:12:01+5:302025-09-11T12:33:58+5:30
राज्यातील भू-बळकाव प्रकरणाचा तपास हा गोवा पोलिसांचे एसआयटी पथक करीत आहे. तर ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या दिशेने तपास केला जात आहे.

ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
पणजी - हणजूण आणि आसगाव येथील भू बळकाव प्रकरणी संशयित यशवंत सावंत आणि इतरांच्या गोवा, हैदराबाद येथील १२ ठिकाणांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या छापेमारीत ७२ लाखांची रोकड आणि काही आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. ईडीने भू बळकाव प्रकरणी हणजूण व आसगाव येथे मंगळवारी चार ठिकाणी छापे टाकले होते. हा १२०० कोटी रुपयांचा घोटाळा असून या अंतर्गत ३.५ लाख चौरस मीटरहून अधिक जमीन बळकावल्याचा आरोप आहे.
ईडीने केलेल्या कारवाईत रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू यासारख्या ७ आलिशान कार जप्त करून काही बँक खातीही गोठवली आहेत. ईडीने केलेल्या कारवाई एक बांधकाम व्यावसायिक व सावंत यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. छापेमारी सुरू असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. गोव्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित संशयितांच्या हैदराबाद येथील ठिकाणांवरही छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम तसेच आलिशान कार जप्त केल्या आहेत. याशिवाय संशयितांची बँक खातीही गोठवल्याची कारवाई करण्यात आली आहे.
राज्यातील भू-बळकाव प्रकरणाचा तपास हा गोवा पोलिसांचे एसआयटी पथक करीत आहे. तर ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या दिशेने तपास केला जात आहे. ३.५ लाख चौरस मीटरहून अधिक जमीन बळकावल्याचा आरोप संशयितांवर असून या घोटाळ्याची व्याप्ती १२०० कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले जात आहे. ईडीकडून पुढेही या प्रकरणी कारवाई सुरूच राहिली, अशी माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, ईडीकडून ९ आणि १० सप्टेंबर २०२५ ला सलग २ दिवस सर्च ऑपरेशन करण्यात आले. जमिनीवर अवैध कब्जा केल्याचे हे प्रकरण आहे. बनावट कागदपत्रे वापरून हजारो एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली होती. आरोपींनी जी जमीन हडपली त्याची बाजार भावानुसार किंमत १२०० कोटीहून अधिक आहे. ईडीच्या या कारवाईत जमिनीशी संबंधित व्यवहाराची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणाचे व्यापक नेटवर्क असल्याचा ईडीला संशय आहे. पुढील तपास अद्याप सुरू आहे.