१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:06 IST2025-12-15T13:05:22+5:302025-12-15T13:06:26+5:30
ईडीने अवैध कफ सिरपची तस्करी आणि त्यासंबंधीच्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर आपली पकड मजबूत करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
ईडीने अवैध कफ सिरपची तस्करी आणि त्यासंबंधीच्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर आपली पकड मजबूत करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. देशभरातील विविध शहरांमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची अवैध कमाई, शेकडो बोगस कंपन्या आणि महागड्या वस्तूंचा पर्दाफाश झाला आहे. प्राथमिक तपासात हे एक संघटित आणि मोठ्या प्रमाणावर चालणारं सिंडिकेट असल्याचं समोर आलं आहे.
ईडीने झारखंडमधील रांची येथे मेसर्स सेली ट्रेडर्सच्या कार्यालयातून १८९ संशयास्पद बोगस कंपन्यांशी संबंधित कागदपत्र जप्त केली आहेत. तपासात असं उघड झालं आहे की, या कंपन्यांनी अंदाजे ₹४५० कोटी रुपयांची खोटा टर्नओव्हर दाखवून अवैध व्यवहार केले होते.
मुख्य आरोपीच्या घरात लक्झरी बॅग आणि महागडी घड्याळं
मुख्य आरोपी शुभम जयस्वालचे घर पाहिलं असता, ईडीला प्रादा (Prada) आणि गुच्ची (Gucci) सारख्या महागड्या बॅग तसेच राडो (Rado) आणि ऑडमर्स पिगुएट (Audemars Piguet) ब्रँडची घड्याळं मिळाली. त्यांची अंदाजित किंमत १.५ कोटींहून अधिक आहे. घराच्या आतील सजावटीवर १.५ कोटी ते २ कोटी रोख रक्कम खर्च झाल्याचे पुरावे देखील मिळाले आहेत.
उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये निलंबित कॉन्स्टेबल आलोक प्रताप सिंहच्या घरावर छापा टाकण्यात आला. तपासात असं दिसून आलं की, त्याने पॉश (Posh) परिसरात एक भव्य घर बांधलं होतं. या घराच्या बांधकामाचा खर्च सुमारे ५ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, तर जमिनीची किंमत वेगळी ठरवली जाईल.
अहमदाबादमध्ये औषध कंपन्यांवर ईडीचे छापे
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मेसर्स आरपिक फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिची उपकंपनी, मेसर्स इधिका लाइफ सायन्सेस यांच्या आवारात छापे टाकण्यात आले. कोडिन-आधारित कफ सिरपची अवैध विक्री आणि गैरवापर तसेच कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचे पुरावे मिळाले होते. कंपनीच्या संचालकांचे दोन फोन देखील जप्त करण्यात आले होते. ईडीने चार्टर्ड अकाउंटंट विष्णू अग्रवालकडून १४० कंपन्यांचा डेटा प्राप्त केला होता. या कंपन्या अवैध पैशांच्या लॉन्ड्रिंगमध्ये सामील असल्याचा संशय आहे.