भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 08:45 IST2026-04-07T08:42:10+5:302026-04-07T08:45:26+5:30
खरातच्या नाशिकमधील कार्यालयासह बंगल्यातून शेकडो आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त

भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नाशिक: महिलांचे शोषण केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. खरात याने अनेक ठिकाणचे भूखंड हडपण्यासह अवैधरीत्या अनेक मालमत्तादेखील खरेदी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी खरातची कोठडी मिळवून चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. खरातच्या मालमत्तांवर ईडीचे अधिकारी लवकरच छापेमारीदेखील करणार असल्याची माहिती ईडीमधील सूत्रांनी दिली.
दरम्यान, खरातच्या नाशिकमधील कार्यालयासह ‘तृप्तबाला’ बंगल्यातून शेकडो आधार कार्ड तसेच पॅन कार्ड एसआयटीने जप्त केले आहेत. खरातने या माध्यमातून आर्थिक व्यवहाराचे मोठे जाळे उभे केले होते. बनावट अकाऊंट नंबर तसेच पतसंस्थांमध्ये शेकडो खात्यांवर स्वत:ला नॉमिनी लावून खरातने करामती केल्याचे उघड झाले. अनेक खात्यांना मोबाइल लिंक आहे. खरात या आधार, पॅन कार्डचा वापर बनावट बँक खाते उघडण्यासाठी करत असे. प्राथमिक तपासात १३१ बनावट खाती पतसंस्थांमध्ये आढळून आली असली, तरी आहिल्यानगर, नाशिक तसेच पुणे जिल्ह्यांत अजून काही बनावट खाती खरातने उघडल्याचा संशय आहे.
अज्ञातकडून सीडीआर मिळाला : अंजली दमानिया
एका अज्ञात व्यक्तीकडून खरातचे सीडीआर मिळाल्यानंतर प्रथम त्याची सत्यता तपासली. मी कोणाकडूनही बेकायदेशीर माहिती मागितलेली नाही. माझ्याकडील माहिती मी पारदर्शकपणे तपास यंत्रणांना दिली आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबईत सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, संजय शिरसाठ तसेच मिलिंद नार्वेकर यांच्यासह विविध पक्षांतील काही नेत्यांचे कॉल रेकॉर्ड्स आढळल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा विषय राजकारणाचा नसून सत्य बाहेर आणण्याचा आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता वस्तुस्थिती समोर आणावी, असे आवाहन त्यांनी केले.
दहावा गुन्हा दाखल
नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात लैंगिक शोषण करण्याचा जो दहावा गुन्हा खरातवर दाखल झाला त्यात लैंगिक अत्याचार करून माझ्यासह कुटुंबातील सदस्यांचे आधार तसेच पॅन कार्ड भाेंदू खरातने ताब्यात घेतले होते अन् ते परत केले नाही, असा जबाब पीडितेने पोलिसांसमोर दिला.