PMO अधिकारी असल्याचं खोटं सांगून घेतली हाय सिक्योरिटी, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 17:22 IST2024-11-09T17:09:23+5:302024-11-09T17:22:23+5:30
किरण पटेल याने पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव असल्याचं सांगून लोकांची फसवणूक केली, त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई केली.

PMO अधिकारी असल्याचं खोटं सांगून घेतली हाय सिक्योरिटी, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला अन्...
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये गेल्या वर्षी फसवणुकीचं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं होतं. फसवणूक करणारा किरण पटेल याने पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव असल्याचं सांगून लोकांची फसवणूक केली, त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई केली. आता ईडीने किरण पटेल आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
ईडीच्या आरोपपत्रात खुलासा झाला आहे की, आरोपींनी पंतप्रधान कार्यालयात नियुक्त अधिकारी असल्याचं खोटं दाखवून जम्मू-काश्मीर सरकारकडून सुरक्षा मिळवली होती, ज्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठं नुकसान झालं. आरोपी किरण पटेल हा अहमदाबादचा रहिवासी आहे.
तपासादरम्यान आरोपी किरण पटेलने काश्मीरमध्ये व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून गुजरातमधील अनेक मोठ्या व्यावसायिकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. २०२३ मध्ये, ईडीने आरोपी किरण पटेल आणि इतरांच्या घरावर छापे टाकले होते आणि अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डॉक्युमेंटरी उपकरणं जप्त केली होती.
पटेलला मार्चमध्ये पंतप्रधान कार्यालयातील उच्च अधिकारी अशी ओळख सांगितल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती, त्यानंतर स्थानिक न्यायालयाने २९ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना जामीन मंजूर केला होता.
जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यादरम्यान, फसवणूक करणारा किरण पटेल याला पीएमओ अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांप्रमाणेच बुलेटप्रूफ कार, सुरक्षा कर्मचारी आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय अशा सुविधा देण्यात आल्या. किरण पटेल यांची पत्नी मालिनी पटेल हिच्यावरही फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे.