आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:03 IST2025-10-14T09:02:28+5:302025-10-14T09:03:08+5:30
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे.

आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. ओडिशातील बालासोर येथील रहिवासी असलेली पीडिता गेल्या शुक्रवारी रात्री तिच्या मित्रासह कॉलेज कॅम्पसबाहेर उभी असताना पाच तरुणांनी तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी तिला गप्प राहण्यासाठी ५,००० रुपये देऊ केले. भीतीमुळे, पीडितेने सुरुवातीला मारहाणीची तक्रार केली, परंतु पोलीस तपासादरम्यान सामूहिक बलात्काराचा खुलासा झाला.
आसनसोल-दुर्गापूरचे पोलीस आयुक्त सुनील कुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने आम्हाला दुःख झालं आहे. आम्ही पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेल असे आश्वासन दिले आहे. आम्ही तिला संरक्षण देऊ केलं, परंतु तिने नकार दिला. १२ ऑक्टोबर रोजी तीन आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी अटक केलेल्या दोन आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
जंगलात सामूहिक बलात्कार
सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलं की, शुक्रवारी रात्री ८ ते ८:४५ च्या दरम्यान ही घटना घडली. तीन तरुणांनी विद्यार्थिनीला घेरलं. तिने तिच्या मित्रमैत्रिणींना मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर आणखी दोन पुरुष घटनास्थळी आले. पाच जणांनी तिचं अपहरण केलं. ते तिला जवळच्या जंगलात घेऊन गेले, जिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
मुलीला घेरलं तेव्हा मित्र पळून गेला
आरोपींनी विद्यार्थिनीला धमकी दिली आणि जर ती कोणालाही न सांगता शांतपणे निघून गेली तर तिला पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिलं. घटनेच्या वेळी तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्राला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पीडितेच्या वडिलांनीही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते, हल्लेखोरांनी त्यांच्या मुलीला घेरलं तेव्हा मित्र तेथून पळून गेला.
"बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
पीडितेच्या वडिलांनी ममता बॅनर्जी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. "मुख्यमंत्री स्वतः एक महिला आहेत, तरीही त्या अशी बेजबाबदार विधानं कशी करू शकतात? महिलांनी नोकरी आणि अभ्यास सोडून घरी बसायचं का? बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन पाहायला मिळत आहे. मला माझ्या मुलीला ओडिशाला परत घेऊन जायचं आहे. आम्हाला भीती आहे की कोणीतरी तिला मारेल. तिचा जीव सर्वात आधी महत्त्वाचा आहे मग तिचं करिअर येतं" असं वडिलांनी म्हटलं आहे.