ड्राय डेने भांडा फोडला, गोलमाल है भाई....पठ्ठ्यांनी घरातील कानाकोपऱ्यात लपवलेल्या दारूच्या बाटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 13:34 IST2023-08-18T13:32:48+5:302023-08-18T13:34:03+5:30
परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्याची रेड: ड्राय डेच्या दिवशी दोन घरांतून दारू हस्तगत

ड्राय डेने भांडा फोडला, गोलमाल है भाई....पठ्ठ्यांनी घरातील कानाकोपऱ्यात लपवलेल्या दारूच्या बाटल्या
अकोला: कोण कधी अन् कशी शक्कल लढवेल. हे सांगता येत नाही. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. हा दिवस ड्राय डे असतो. या दिवशी दारू मिळत नसल्याने, अनेक दारू विक्रेत अवैध साठा करून ठेवतात. पण अकोट ग्रामिण पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या पोपटखेड गावातील दोन पठ्ठ्यांनी तर कमालच केली. त्यांनी दारूचा साठा चक्क घरातील किचन, बेडरूममध्ये खड्डा करून लपवून ठेवला. परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी सुरज गुंजाळ व त्यांच्या टीमने अक्षरश: फावड्याने घरातील खड्डे खोदून ३२ हजार रूपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा हस्तगत गेला.
गुंजाळ हे पोलिस पथकासह गस्तीवर असताना, त्यांना १५ ऑगस्ट रोजी दुपारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी पोपटखेड येथे येणारे काही लोकांना अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह पोपटखेड दोन घरांमध्ये छापा मारला. परंतु त्यांना दारूच्या बाटल्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पथकासह एका महिलेच्या घरातील किचनची पाहणी केली. किचनमधील बेसिनच्या खाली खड्डा असल्याचे आढळून आल्यावर त्यांनी, फावड्याने खोदल्यावर, त्यातून देशी दारूच्या तब्बल ३२१ बाटल्या आढळून आल्या.
त्यानंतर त्यांनी दिलीप जयकिशोर जयस्वाल याच्या घरात तपासणी केली असता, त्याने बेडरूममधील एका कोपऱ्यात खड्डा करून दारू लपवल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या घरातून ७० विदेशी दारूच्या बाटल्या हस्त केल्या. ही कारवाई पोलिस कर्मचारी उमेशचंद्र सोळंके, वामन मिसाळ, हरिश सोनवणे, सुधीर झटाले, सचिन गायकवाड, शंकर जायभाये यांनी केली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी सुरज गुंजाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने घरातील कानाकोपऱ्यात लपवून ठेवलेल्या दारूच्या बाटल्या खोदून-खोदून बाहेर काढल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, अनेकांनी तर सब गोलमाल है भाई असे टायटल देऊन कारवाईचे कौतुक केले.