संतापजनक! कर्ज फेडण्यासाठी बापाने 4 वर्षीय लेकीला ठेवलं गहाण; काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 13:23 IST2023-05-15T13:19:10+5:302023-05-15T13:23:17+5:30
नशा करण्यासाठी एका व्यक्तीकडून काही पैसे घेतले होते, जे तो परत करू शकला नाही.

फोटो - आजतक
राजस्थानमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एका पित्याने आपल्या निष्पाप मुलीला गहाण ठेवलं. तसेच त्याने कर्ज फेडल्यावर मुलीला सोडा, असं देखील सांगितलं. जयपूरमध्ये ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या एका भागात एक व्यक्ती त्याची पत्नी, 4 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षाच्या मुलासोबत राहतो. तो रद्दीचे काम करतो आणि त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे.
नशा करण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून काही पैसे घेतले होते, जे तो परत करू शकला नाही. दुसरीकडे पैसे देणारी व्यक्ती याबाबत वारंवार तक्रार करायची. याच दरम्यान, पैसे देण्यासाठी त्याने हे घृणास्पद कृत्य केलं, हे उघडकीस आल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला आहे. तिच्याकडून भीक मागून पैसे घ्या, असं सांगून त्याने आपली मुलगी ज्या व्यक्तीने त्याला कर्ज दिलं होतं, त्याच्या स्वाधीन केली.
मुलगी भीक मागून रोज 100 रुपये आणायची आणि त्याला द्यायची. आतापर्यंत तिने 4500 रुपये दिले आहेत. दरम्यान, त्याच्या 6 वर्षाच्या भावाने तिला तेथून बाहेर काढले आणि कोटा येथे नेले. दोघेही रेल्वे कॉलनी परिसरात फिरत असल्याचे पाहून नगरसेवकाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी करून त्यांना बाल कल्याण समितीकडे नेले. समिती सदस्य अरुण भार्गव यांनी मुलांचे समुपदेशन केले तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली
आरोपीवर कारवाई केली जाईल - बालकल्याण समिती
मुलाने सांगितले की, त्याची आई अपंग आहे आणि वडिलांना दारूचे व्यसन आहेत. उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी त्यांनी बहिणीला गहाण ठेवलं होतं. दुसरीकडे, अरुण भार्गव यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी ग्रामीण आणि एसपी शहर आमच्याकडे आले होते. याप्रकरणी पोलीस आरोपी बाप आणि भीक मागायला लावणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.