"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:43 IST2025-08-25T18:43:09+5:302025-08-25T18:43:32+5:30
आपल्या मनातील वेदना एका कागदावर लिहून तरुणाने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींनी ग्रासलेल्या एका तरुणाने गाझीपूर येथील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे.
या सुसाईड नोटमध्ये तरुणाने अत्यंत वेदनादायक मागणी केली आहे. त्याने लिहिले आहे की, "माझा अंत्यसंस्कार वर्गणी गोळा करून करावा, पण माझा मृतदेह माझ्या काकांकडे किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला देऊ नये."
हॉटेलमध्ये काय घडले?
ही घटना सदर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी एका खोलीचा दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे पाहिले, तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी व्हिडिओग्राफीच्या मदतीने खिडकीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना तरुण जमिनीवर पडलेला आणि त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसले. पोलिसांनी दरवाजा तोडून तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण: आर्थिक अडचण
पोलिसांना घटनास्थळी जी सुसाईड नोट मिळाली, त्यात तरुणाने आपल्या बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले आहे की, त्याचा अंत्यसंस्कार वर्गणी गोळा करून करण्यात यावा आणि त्याचे मृत्यू प्रमाणपत्र त्याच्या सासरच्या मंडळींना देण्यात यावे. या संदर्भात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, "सदर तरुण आर्थिक अडचणींना सामोरे जात होता. आम्हाला सुसाईड नोट मिळाली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल."
मृत तरुण बिहारचा रहिवासी
मृत तरुणाची ओळख ओम प्रकाश राय, बिहारचा रहिवासी, अशी झाली आहे. त्याचे सासर मोहम्मदाबादच्या तमलपूर येथे होते. तो एका सिमेंट फॅक्टरीत काम करत होता, मात्र २०२१ मध्ये त्याच्या पत्नीचे निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरीही गेली, ज्यामुळे तो प्रचंड तणावात होता. त्याच्याकडे खोलीचे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते, असे सांगितले जाते.