'माझी बॉडी दान करुन टाका...'; मुलीने टिश्यू पेपरवर लिहिला शेवटचा मेसेज, पालकांना काय चूक झाली कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:41 IST2025-08-26T13:22:28+5:302025-08-26T13:41:39+5:30

मध्य प्रदेशात वही हरवल्यामुळे आई ओरडल्यानंतर सातवीतल्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं.

Donate my body Seventh class student end her life after being scolded for losing her copy book | 'माझी बॉडी दान करुन टाका...'; मुलीने टिश्यू पेपरवर लिहिला शेवटचा मेसेज, पालकांना काय चूक झाली कळेना

'माझी बॉडी दान करुन टाका...'; मुलीने टिश्यू पेपरवर लिहिला शेवटचा मेसेज, पालकांना काय चूक झाली कळेना

Bhopal Child Death: गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरुन शाळकरी मुलंही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आई वडिलांची भीती, हट्ट किंवा छोट्या चुका या सारख्या गोष्टीमुळे लहान मुलं हे पाऊल उचलत आहेत. यामुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झालीय. अशातच मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये वही हरवल्यावरुन आईकडून ओरडा मिळाल्याने एका सातवीतल्या मुलीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी या मुलीने सुसाईड नोट देखील लिहीली होती. ते वाचून तिच्या आई आणि बाबांना जबरदस्त धक्का बसला.

सोमवारी सकाळी भोपाळमधील कटारा हिल्स परिसरात १३ वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या खोलीत आत्महत्या केली. ही घटना केवळ कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण परिसरासाठी हादरवणारी होती. मृत मुलगी सातवीची विद्यार्थिनी होती आणि तिच्या दोन लहान भावांमध्ये ती सर्वात मोठी होती. मुलीने तिच्या मृत्यूपूर्वी दोन सुसाईड नोट्स लिहिल्या होत्या, त्यापैकी एका नोटमध्ये तिने तिचे शरीर दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि दुसऱ्या नोटमध्ये तिने तिच्या भावाला कॉम्प्युटर टेबल आणि आणखी काही वस्तू देण्यास सांगितले होते. 

मुलीच्या आत्महत्येची बातमी पसरताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेच्या वेळी पालक घरी नव्हते असे सांगण्यात येत आहे. दोघेही त्यांच्या धाकट्या भावाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीने बेल्ट आणि कापडाच्या फाशीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई वडील जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्या मुलीची अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय झाले आणि कसे झाले हे त्यांना समजले नाही. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आईवडील आणि भाऊ सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. आई मोठ्या भावाला शाळेत सोडत असे आणि वडील  धाकट्या भावाला शाळेत सोडायची. आई मुलीची नागरिकशास्त्राची वही शोधत होती, जी शाळेत तपासायला द्यायची होती. वही न मिळाल्याने आई मुलीवर ओरडली होती. त्यानंतर ती मोठ्या मुलाला आणि वडील धाकट्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघून गेले. ते परत आले तेव्हा त्यांना मुलगी घरात कुठेच दिसत नव्हती. दोघेही तिला शोधू लागले. शोध घेत असताना ते घराच्या पहिल्या मजल्यावर पोहोचले आणि मुलगी तिच्या खोलीत फाशीवर लटकलेली होती.

पीडित मुलीने टिश्यू पेपरवर एक ओळ लिहिली ज्यामध्ये तिने तिच्या मृत्यूनंतर तिचे शरीर दान करण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या चिठ्ठीत तिने तिच्या वस्तू, कॉम्प्युटर टेबल आणि तिची खोली तिच्या भावाला द्याव्यात असं म्हटलं होतं. या चिठ्ठ्यांमुळे कुटुंबाला आणि पोलिसांनाही धक्का बसला आहे.

दरम्यान मृत मुलीचे वडील सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय काम करतात. हे कुटुंब मूळचे सतना येथील आहे. शवविच्छेदनानंतर, कुटुंब मृतदेह घेऊन त्यांच्या गावी पोहोचले आहे. परतल्यानंतर कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात येणार आहे.
 

Web Title: Donate my body Seventh class student end her life after being scolded for losing her copy book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.