प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: पैशांच्या हव्यासापायी एका हॉटेल अटेंडंटने चोरीचा मार्ग अवलंबिल्याची धक्कादायक घटना सोनसाखळी चोरीच्या गुन्हयात उघडकीस आली आहे. परेश किशोर घावरी ( वय ३५) रा. कल्याण पश्चिम असे त्याचे नाव असून डोंबिवलीमधील दोन आणि मध्यवर्ती पोलिस ठाण्यातील एका गुन्हयात आरोपी असलेल्या परेशला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ठाकुर्ली, ९० फुटी रोडवर २३ जून आणि ९ जुलैला सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. या गुन्हयाच्या तपासकामी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे, पोलिस उपनिरिक्षक प्रसाद चव्हाण, गोरखनाथ गाडेकर, पोलिस हवालदार सुनिल भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, पोलिस शिपाई निलेश पाटील, देविदास पोटे, राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे आदिंचे पथक नेमले होते. अटक केलेल्या परेशकडून चोरी केलेल्या सोनसाखळया आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. परेश हा कल्याणमधील एका नामांकीत हॉटेलमध्ये अटेंडंट म्हणून काम करायचा परंतू झटपट पैसा कमाविण्याच्या हव्याशापोटी त्याने चोरीचा मार्ग पत्करल्याची माहिती तपासात समोर आली. त्याला चोरीच्या गुन्हयात सहकार्य करणा-याचा शोध सुरू आहे.
तब्बल १७२ सीसीटिव्ही कॅमेरे तपासले
चोरटयांच्या तपासकामी त्यांची माहिती काढण्यासाठी तसेच मागोवा घेण्यासाठी चोरीच्या केलेल्या मार्गावरील तब्बल १७२ सीसीटिव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासण्यात आले.
११ तासात केला दुसरा गुन्हा
परेश आणि त्याच्या साथीदाराने मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उल्हासनगर ३ मधील भाई साहेब मेहरवान सिंग चौकात ८ जुलैला रात्री १० च्या सुमारास एका ६७ वर्षीय महिलेच्या गळयातील सोन्याचा ऐवज लांबविला होता. या घटनेला ११ तासांचा कालावधी उलटत नाही तोच रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठाकुर्लीत ९० फुटी रोडवर ९ जुलैला सकाळी ८ ते पावणेनऊच्या दरम्यान ६३ वर्षीय महिलेल्या गळयातील सोन्याची चेन लांबविली होती.